ऑनलाइन गुंतवणूक करणाऱ्यांना बसतोय फटका : आभासी फायदा दाखवून घालत आहेत गंडा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी दोघांची १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विमानतळ आणि मुंढवा पोलीस ठाण्यांमध्ये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत एका ३९ वर्षीय तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुण विमाननगर भागात राहतो. सायबर चोरट्यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्याच्या मोबाइलवर एक मेसेज पाठवला होता.
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्याला दाखवले होते. त्यानंतर तरुणाने काही रक्कम गुंतवली. चोरट्यांनी त्याच्या बँक खात्यात परताव्यापोटी काही रक्कम जमा केली.
परतावा मिळाल्यामुळे तरुणाला आणखी रक्कम गुंतवण्यास सांगण्यात आले. त्यानुसार तरुणाने चोरट्यांच्या खात्यात ५ लाख ४९ हजार रुपये जमा केले. मात्र, पैसे खात्यात जमा झाल्यानंतर चोरट्यांनी आपले मोबाइल क्रमांक बंद केले आणि त्याला परतावा दिला नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) आशालता खापरे तपास करत आहेत. अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी मुंढवा भागातील ४१ वर्षीय तरुणाची ५ लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक केली.
चोरट्यांनी तक्रारदाराला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्याची फसवणूक केली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाबासाहेब निकम तपास करत आहेत.
