हिंजवडी, बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : जामिनाच्या अर्जावर पोलिसांचे म्हणणे सादर करण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह, अपघाताचा गुन्हा दाखल न करण्यासाठी खासगी व्यक्तीच्या मदतीने लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हिंजवडी पोलीस ठाणे व बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
मारामारीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीच्या जामिनाच्या अर्जावर न्यायालयात म्हणणे सादर करण्यासाठी आरोपीच्या पत्नीला ६० हजार रुपयांची लाच मागून, तडजोडीनंतर ३० हजार रुपयांवर तडजोड करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नामदेव काळे याच्याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका ३० वर्षांच्या महिलेने तक्रार केली होती. तिच्या पतीविरोधात मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अटक करून न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्या गुन्ह्यातून जामिनासाठी तिने न्यायालयात अर्ज केला.
न्यायालयाने पोलिसांना त्यांचे म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले होते. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांनी म्हणणे सादर करण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच मागितली होती. या महिलेने १५ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
पंचासमक्ष पडताळणी दरम्यान, त्यांनी तडजोडीअंती ३० हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. मात्र प्रत्यक्ष सापळा कारवाई होऊ शकली नाही. तरीसुद्धा लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने, १४ मे रोजी त्यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रेम वाघमोरे करत आहेत.
मोटार अपघाताचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि वाहन सोडवण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागून, तडजोडीनंतर १० हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य करणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्तीविरोधात लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिल माणिक जगताप (वय ५६) असे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे, तर प्रविण भाऊसाहेब भोसले (वय ३९) असे खासगी व्यक्तीचे नाव आहे. सुनिल जगताप सध्या बारामती तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. याबाबत एका २६ वर्षांच्या तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
तक्रारदार चालवत असलेल्या मोटारीचा अपघात झाला होता. या अपघाताचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि वाहन सोडवण्यासाठी सुनिल जगताप यांनी ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. या तरुणाने १८ मार्च रोजी तक्रार दिली होती.
१८, १९ व २० मार्च रोजी झालेल्या पडताळणी दरम्यान पंचासमक्ष, सुरुवातीला १५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीनंतर १० हजार रुपये स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले होते. या लाच मागणीच्या प्रकरणात खासगी व्यक्ती प्रविण भोसले यांचाही सहभाग होता. प्रत्यक्ष सापळा कारवाई झाली नाही. मात्र, लाचेची मागणी झाल्याने बारामती तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करत आहेत.
