महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : नागरी संरक्षण दल, गृह विभाग (विशेष) पुणे शहर यांच्या वतीने सह्याद्री हॉस्पिटल, शास्त्रीनगर, येरवडा येथे अग्निशमन प्रथमोपचाराबाबत प्रात्यक्षिके करण्यात आली. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांना मॉकड्रीलच्या माध्यमातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.
या प्रात्यक्षिकात नागरी संरक्षण दलाचे ११ स्वयंसेवक, ३० होमगार्ड जवान, तसेच पुणे महानगरपालिकेच्या येरवडा येथील अग्निशमन विभागाने अग्निशमन अधिकारी पवार यांच्या नेतृत्वाखाली, अचानक लागलेल्या आगीपासून बचाव करण्यासाठी विविध प्रकारचे फायर नोजल्स वापरून प्रात्यक्षिके सादर केली.
इन्सिडेंट कमांडर ऑफिसर म्हणून नागरी संरक्षण दल पुणे शहराचे मुख्य क्षेत्ररक्षक जॉर्ज स्वामी यांनी काम पाहिले. महिला मानसेवी अधिकारी अर्चना वाघमारे यांनी हॉस्पिटलमधील रुग्ण व नातेवाईकांना घाबरू नये, अफवा पसरवू नयेत आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, याबाबत मार्गदर्शन केले.
नागरी संरक्षण दल पुणे शहर कार्यालयातर्फे ज्येष्ठ सहायक उपनियंत्रक अर्जुन कुऱ्हाडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह आपत्तीच्या काळात घाबरून न जाता सुरक्षात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. नागरी संरक्षण दल पुणे शहराचे उपनियंत्रक ले. कर्नल (नि) प्रशांत चतुर आणि मुख्य क्षेत्ररक्षक जॉर्ज स्वामी यांनी मॉकड्रीलचे नियोजन केले.















