नियमभंग करणाऱ्या डंपर : खासगी बसवर कठोर कारवाई करण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे आदेश
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शहरातील अवजड वाहने आणि खासगी बसचालकांकडून वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. अशा प्रकरणांमध्ये आता थेट वाहन जप्तीची कारवाई करा, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी दिले. वाहतुकीवरील यंत्रणेबाबत पोलिसांची कारवाई अपुरी पडत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.
वाहतूक पोलीस प्रशिक्षणाच्या सांगता समारंभात पोलीस आयुक्त अमितेशकुमार बोलत होते. यावेळी सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, डॉ. राजकुमार शिंदे, अजय अग्रवाल, शशिकांत पाटील, अनिल पंतोजी, प्रकाश जाधव, महादेव गावडे, अशोक शिंदे, सुरेंद्र देशमुख, मंजिरी गोखले, उर्मिला दीक्षित आदी उपस्थित होते.
अमितेशकुमार म्हणाले, “शहरात अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. अनेकांना त्यात प्राण गमवावे लागत आहेत. खुनाच्या घटनांपेक्षाही अपघातातील मृतांची संख्या अधिक आहे.
रस्ते अपघात हे खुनाच्या गुन्ह्यांपेक्षाही गंभीर असल्याचे आम्ही मानतो. त्यामुळे अवजड वाहतुकीवर अनेक निर्बंध घातले आहेत. मात्र, दंडात्मक कारवाई करूनदेखील ही वाहने सर्रास शहरात फिरताना दिसतात. या कारवाईबाबत मी नाराज आहे.”
“डंपर, खासगी बसचालकांकडून सातत्याने नियमभंग होत असेल, तर त्यांची वाहने जप्त करून ठेवा,” असे निर्देश पोलीस आयुक्तांनी वाहतूक पोलीस अंमलदारांना दिले. पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदारांना २३ फेब्रुवारी ते १० मे या तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण १८ सत्रांत विविध तज्ज्ञांद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमाचा सांगता समारंभ बुधवारी झाला.
मान्सूनमध्ये वाहतूक पोलीस रस्त्यावर –
गेल्या वर्षी शहरात ज्या ठिकाणी पाणी साचले होते, झाडपडीच्या घटना घडल्या होत्या, त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली होती. यंदा त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मान्सूनमध्ये वाहतूक पोलीस पूर्ण क्षमतेने रस्त्यावर उतरणार आहेत.
यासाठी वाहतूक पोलिसांनी महापालिकेच्या पथकासमवेत ड्रिल करावी. गेल्या वर्षी ज्या समस्या उद्भवल्या, त्या यंदा उद्भवता कामा नयेत. गरज पडल्यास रात्री-बेरात्री वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरावेत, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.
सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले की, वाहतूक पोलीस अधिकारी व अंमलदारांना सॉफ्ट स्किल्स, मोटार वाहन कायदा व वाहतूक नियमनाबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणाचा उपयोग दैनंदिन कामकाजात करून नागरिकांमधील प्रतिमा सुधारावी, असे आवाहन त्यांनी केले.
