७५०० चौ.फुट जागा मोकळी : १६ शेड हटवले, ७ ट्रक साहित्य जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे: कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील कात्रज-कोंढवा रस्त्यावर अतिक्रमणामुळे नागरिकांना होणारा त्रास, वाहतूक कोंडी आणि वारंवार होणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने मोठी कारवाई केली.
कात्रज-कोंढवा रस्त्यावर नागरिकांच्या तक्रारी व वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे महापालिकेचे आयुक्त तसेच उपआयुक्त (अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम विभाग) यांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार दिनांक १५ मे २०२५ रोजी कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कात्रज कोंढवा ते खडीमशीन चौक या दरम्यान रस्त्यालगतच्या पदपथांवर व फ्रंट व साईट मार्जिनवरील अतिक्रमणावर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई उपआयुक्त (परिमंडळ क्र. ४) जयंत भोसेकर, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त संदीप खलाटे आणि सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. कारवाईमध्ये बांधकाम विकास विभाग व अतिक्रमण विभागाच्या पथकांनी संयुक्तरीत्या सहभाग घेतला.
कारवाईदरम्यान उप अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंते ढगे, उदय पाटील, विजय पाटील, अतिक्रमण निरीक्षक तारु व राऊत, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक नवाळी, गांगुर्डे, खैरनार, पवार, माने तसेच पोलीस निरीक्षक कांबळे आणि १० महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी उपस्थित होते.
या कारवाईत सुमारे ७५०० चौरस फूट क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले. यामध्ये १६ कच्चे व पक्के शेड हटवले गेले आणि ७ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. महापालिकेच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
जप्त साहित्याचा तपशील
स्टॉल – ०१
टप हातगाडी – ०५
स्टील काऊंटर – ०५
लोखंडी काऊंटर – ०३
स्टील टेबल – ०२
ऊस गुराळ – ०१
लोखंडी टेबल – ०१
सोफा सेट – ०६
लोखंडी कॉट – ०६
प्लास्टिक खुर्च्या – ११
प्लास्टिक स्टूल – १६
फ्रिज – ०१
लोखंडी पाळणा – ०१
सायकली – १३
सायकल पंप – ०१
व्यावसायिक चारचाकी वाहन MH/12/BP/5435 – ०१
