कर्वे रस्त्यावरील घटना : हाऊस किपिंग कंत्राटदाराला अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : हाऊस किपिंगच्या कंत्राटावरून झालेल्या वादातून कंपनीच्या आवारात येऊन पहाटेच्या सुमारास सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा घाव इतका जोरदार होता की सुरक्षा रक्षक कोमात गेला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी अलंकार पोलिसांनी हाऊस किपिंगच्या कंत्राटदाराला अटक केली आहे.
अर्थव गणेश चव्हाण (वय २२, रा. गणेशनगर, एरंडवणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अशोक तुकाराम पोटे (रा. गणेशनगर, एरंडवणे) हे सुरक्षा रक्षक या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी सचिन नामदेव सातपुते (वय ३०, रा. केळेवाडी, कोथरूड) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कर्वे रस्त्यावरील रेस्कॉन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या मीटर रूममध्ये गुरुवारी, १५ मे रोजी पहाटे साडेचार वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन सातपुते हे रेस्कॉन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत ऑफिस बॉय म्हणून कार्यरत आहेत. कंपनीतील काम संपल्यावर ते शेजारील टीव्हीडीसी डान्स स्टुडिओमध्ये पार्टटाइम मॅनेजर म्हणून काम करतात आणि रात्री तेथेच झोपतात.
रेस्कॉन कंपनीत सुरेंद्र कुमार यादव (रा. शास्त्रीनगर, कोथरूड) आणि अशोक तुकाराम पोटे हे रात्रपाळीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. १५ मे रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास सुरेंद्र कुमार यांनी सचिन सातपुते यांना उठवून सांगितले की, अशोक पोटे यांच्यावर कोणीतरी हल्ला केला असून ते रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत.
सातपुते यांनी मीटर रूममध्ये जाऊन पाहिले असता, अशोक पोटे हे जमिनीवर पडलेले होते आणि त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर त्यांनी पोटे यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. या मारहाणीमुळे पोटे कोमामध्ये गेले आहेत.
घटनेची माहिती मिळताच अलंकार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अर्थव चव्हाण याला अटक केली. अर्थव चव्हाण हा हाऊस किपिंगचे कंत्राट घेतो.
या कंत्राटावरून पोटे आणि चव्हाण यांच्यात पूर्वी वाद झाला होता. त्या रागातून चव्हाण याने पहाटे येऊन पोटे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करत खुनाचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित करत आहेत.
