आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कात्रजमधून तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक

Spread the love

पुणे : भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करून कात्रज परिसरातील शनिनगर येथे राहणाऱ्या तिघा बांगलादेशी नागरिकांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

हलाल अश्रफ खान (वय ३३), सोहेल खोका शेख (वय ३२) आणि लामिया अल्ताफ हवालदार (वय ३२, तिघेही मूळ रा. बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात परकीय नागरिक कायदा, पारपत्र अधिनियम आणि परकीय नागरिक आदेश कलमांन्वये आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक रतिकांत चंद्रशा कोळी यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हलाल खान, शेख आणि हवालदार हे पंधरा दिवसांपासून पुण्यातील शनिनगर येथील जय शिव मल्हार सोसायटीतील एका घरामध्ये राहत होते.

याबाबतची माहिती आंबेगाव पोलिसांना मिळाल्यानंतर परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने आणि त्यांच्या पथकाने कारवाई करून तिघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून मोबाईल फोन आणि बांगलादेशी नागरिकत्वाची ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्याकडे कोणतेही भारतीय ओळखपत्र नव्हते. आरोपींनी त्यांच्या मोबाईलवरून बांगलादेशात संपर्क साधल्याची कबुली दिली आहे.

पाच वर्षांपासून भारतात असल्याचा दावा
हलाल खान मिळेल तेथे मोलमजुरी करतो. २०२० मध्ये त्याला नवी मुंबई पोलिसांनी बांगलादेशी असल्याच्या आरोपावरून अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयाकडून जामीन मिळाल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याच्या म्हणण्याची पोलिसांकडून तडतोड करण्यात येत आहे. सहायक पोलीस फौजदार भोजलिंग दोडमिसे तपास करत आहेत.