कर्जत व येरवडा पोलिसांची कामगिरी : ८० लाख रुपये हस्तगत, १७ लाख रुपयांचा तपास सुरू
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : व्यावसायिकाची ९७ लाख रुपयांची बॅग पळविणाऱ्या ड्रायव्हरला कर्जत व येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून ८० लाखरुपये हस्तगत केले असून, उर्वरित १७ लाख रुपयांचा तपास सुरू आहे. एनआयबीएम ते कल्याणीनगर दरम्यान ४ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली होती.
विजय महादेव हुलगुंडे (वय २२, टिळेकरनगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे) आणि नाना रामचंद्र माने अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, एनआयबीएम येथील निवासस्थानापासून कल्याणीनगर येथे आल्यानंतर फिर्यादीने लघशंकेसाठी कार थांबविण्यासाठी सांगितल्यानंतर चालकाने कार थांबविली. त्यानंतर कारमधील ९७ लाख रुपये घेऊन पसार झाला होता. पोलिस तपास सुरू असताना विजय हा कर्जतमधील असल्याने कर्जत पोलिसांना ही माहिती दिली होती. कर्जत पोलिसांना आरोपी वीर (ता. पुरंदर) येथील असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या पथकाने विजय महादेव हुलगुंडे व नाना रामचंद्र माने या दोन्ही आरोपींना पकडून येरवडा पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर व कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. तपासादरम्यान आरोपींकडून ८० लाख रुपये जप्त केले असून, उर्वरित १७ लाख रुपयांचा तपास सुरू आहे.
अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान, युनिट-५ कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर, कर्जत पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे कर्मचारी व गुन्हे शाखा युनिट-५चे कर्मचारी, येरवडा पोलीस स्टेशन तपास पथकातील कर्मचारी सहायक पोलीस फौजदार प्रदीप सुर्वे, पोलीस हवालदार दत्ता शिंदे, पोलीस नाईक अमजद शेख, कैलास डुकरे, तुषार खराडे, गणेश वाघ, किरण घुटे, पोलीस शिपाई अनिल शिंदे, अजित वाघुले, गणेश शिंदे, राहुल परदेशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
