युनिट-१ची कारवाई : पुण्यातील व्यावसायिकाला ईडीच्या चौकशीचे धमकी प्रकरण
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील एका प्रसिद्ध व्यावसायिकाच्या उद्योगसमूहाच्या एका कंपनीने घेतलेल्या कर्जामध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा बनाव रचून आयकर विभागाची चौकशीची धमकी दिल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. एवढेच नाही तर आरोपींनी संनमत करुन हे प्रकरण मिटवण्यसाठी 50 लाख रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणातील एका आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-१ने बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई सहकारनगर नं.2 येथे केली.
रुपेश ज्ञानोबा चौधरी (वय-46 रा. प्लॅट नं. बी/303, तिसरा मजला, पाटे संस्कृती, सहकारनगर नं. 2) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचे साथिदार अमित मिरचंदानी, विकास भल्ला, संतोष राठोड व इतर आरोपींचा गुन्हे शाखेचे पोलीस शोध घेत आहेत. हा प्रकार शनिवार पेठेतील अमित मिरचंदानी च्या कार्यालयात 22 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता घडला आहे. याप्रकरणी 43 वर्षीय व्यावसायिकाने विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट एक करीत आहे.
आरोपी रुपेश चौधरी हा त्याच्या घरी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-१च्या पोलीस अमलदारांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सहकारनगर येथील त्याच्या घराजवळ सापळा रचून आरोपीला अटक केली. रुपेश याच्यावर यापूर्वी दत्तवाडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. त्याला न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने 11 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
काय आहे प्रकरण ?…
आरोपींनी संगनमत करुन फिर्यादीच्या ग्रुपमधील एका कंपनीने डी. एच. एल. एफ. यांच्याकडून घेतलेल्या 68 कोटीच्या कर्जात आर्थिक घोटाळा झाला आहे, असा बनाव रचला. त्या प्रकरणात आयकर विभागाने हरकत घेतली असून त्यामुळे ईडी व एसएसआयओ यांनी त्रुटी काढल्या आहेत, असे चित्र निर्माण केले.
संतोष राठोड याने ईडीचे दिल्लीतील अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत. ते पुण्यात आलेले असून तुमची केस त्यांच्याकडे प्रलंबित आहे. ते प्रकरण मिटवून देतो, असे सांगितले. त्याला फिर्यादी नकार दिल्यावर रुपेश चौधरी याने फिर्याद यांना माझ्याकडे 200 मुलांची टीम आहे बघुन घेईन अशी धमकी दिली. त्या सर्वांनी प्रकरण मिटविण्यासाठी फिर्यादीकडे 50 लाख रुपयांची मागणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार सतीश भालेकर, दत्ता सोनावणे, राहुल मखरे, महेश बामगुडे, रुक्साना नदाफ यांच्या पथकाने ही कारवाई केली.
