८६ पैकी २४ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा अधिक गुण; पाच विद्यार्थ्यांचे विषयात शंभर पैकी शंभर गुण
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून ‘सेंट जोसेफ सीनियर सेकंडरी स्कूल, बार्शी’ या नामांकित शाळेने यंदाही 100% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये एकूण 86 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यामधील 24 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवून विशेष यश संपादन केले आहे, तर 60% विद्यार्थ्यांनी 80% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
या यशामध्ये सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कु. जान्हवी बारबोले हिने ‘इंग्रजी’ आणि ‘मराठी’ या दोन्ही विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवत 98.4% गुणांसह शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. कु. शुभ्रा सरवदे हिने 97.6% गुणांसह द्वितीय तर कु. हर्षिता माळी हिने 97.4% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
कु. श्रावणी इनामदार हिने देखील ‘मराठी’ विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले. कु. प्रितिका शहा हिने ‘गणित’ विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली, तर मयंक जैन याने आयटी (IT) विषयात 100 पैकी 100 गुण मिळवत विशेष यश संपादन केले.
या गौरवशाली यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक फादर वर्गीस अगस्ती, सर्व शिक्षकवृंद आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. बार्शी पंचक्रोशीतून या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक होत आहे.
शाळेचे उत्तुंग निकाल हे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे आणि विद्यार्थ्यांच्या अथक मेहनतीचे फळ आहे, असे प्रशंसात्मक उद्गार पालक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले आहेत.
