महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : राज्य प्रशासनातील अत्यंत अनुभवी आणि कुशल अधिकारी आनंद भंडारी यांची नुकतीच अहिल्यानगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नियुक्ती झाली आहे.
त्यांनी ५ जून २०२५ रोजी अतिरिक्त आयुक्त, जमाबंदी व भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे या पदाचा पदभार स्वीकारला होता, आता ते अहिल्यानगरच्या विकासासाठी कार्यरत होणार आहेत.
त्यांनी ग्रामपंचायत प्रशासन, पंचायत राज व्यवस्था सक्षमीकरण, मृद व जलसंधारण, पर्यावरण रक्षण, स्वच्छ भारत अभियान, प्रशिक्षण व क्षमता बांधणी, तसेच विविध विकास योजना व अभियानांची अंमलबजावणी अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.
शैक्षणिक आणि प्रशासकीय पार्श्वभूमी
भंडारी यांचे मूळ गाव बेल्हे (ता. जुन्नर, जि. पुणे) असून, त्यांनी M.Sc. Agriculture ही पदवी राहुरी येथून पूर्ण केली आहे. त्यांनी २००१ मध्ये नायब तहसीलदार म्हणून प्रशासकीय सेवेत प्रवेश केला आणि त्यानंतर विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या.
IAS मध्ये निवड व सन्मान
२४ मे २०२४ रोजी राज्य शासन व केंद्रीय लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांनी घेतलेल्या परीक्षांद्वारे आनंद भंडारी यांची भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये (IAS) निवड झाली. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत २०१८ साली ग्रामविकास विभागाचा गुणवंत अधिकारी पुरस्कार त्यांना मा. राज्यपालांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला होता.
नव्या जबाबदारीकडे आशाभाव
अहिल्यानगरच्या विकासाच्या दिशेने भंडारी यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाकडून नवे पाऊल उचलले जाणार आहे. त्यांची समृद्ध अनुभवसंपन्न पार्श्वभूमी आणि कार्यक्षम नेतृत्वामुळे अहिल्यानगरच्या ग्रामविकास कार्यास निश्चितच नवे बळ मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
शैक्षणिक आणि प्रशासकीय पार्श्वभूमी
२००१-२००२: नायब तहसीलदार, सातारा
२००२-२००३: परिविक्षाधीन गट विकास अधिकारी, सातारा जिल्हा परिषद
२००३-२००७: गट विकास अधिकारी, पंचायत समिती खेड, पुणे
२००७-२०११: गट विकास अधिकारी, पंचायत समिती जुन्नर
२०११-२०१४: उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद पुणे
२०१४-२०१८: उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद सातारा
२०१८-२०१९: प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अमरावती
२०१९-२०२१: अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड
२०२१-२०२५: संचालक, पंचायत राज, महाराष्ट्र राज्य
