आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जमिनीच्या हिस्सेवाटपासाठी मोजणी फक्त २०० रुपयांत

Spread the love

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता शेतीच्या जमिनीच्या हिस्सेवाटपासाठी लागणाऱ्या मोजणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली असून, ही मोजणी केवळ २०० रुपयांत होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून, यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळणार आहे.

हिस्सेवाटप प्रक्रियेत अनेकदा एकत्र कुटुंबातील सदस्यांना आपापला हिस्सा निश्चित करण्यासाठी मोजणी करावी लागते. याआधी या मोजणीसाठी प्रति हिस्सा १००० ते ४००० रुपये शुल्क आकारले जात होते.

ही रक्कम आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा बोजा ठरत होती. आता मात्र केवळ २०० रुपये भरून शेतकऱ्यांना नोंदणीकृत वाटणीपत्र व जमिनीचे नकाशे मिळणार आहेत.
राज्यातील अनेक भागांमध्ये शेती ही एकमेव उत्पन्नाचा स्रोत आहे.

हिस्सेवाटपासाठी लागणारे जास्त शुल्क हे अनेक कुटुंबांमध्ये तणावाचे कारण ठरत होते. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना मोजणी झाल्यानंतर अधिकृत वाटणीपत्र दिले जाईल.

यासोबतच त्यांच्या जमिनीचे अधिकृत नकाशेही मिळतील, जे त्यांच्या मालकीचे स्पष्ट पुरावे असतील. त्यामुळे भविष्यात जमिनीशी संबंधित कोणतेही वाद निर्माण होण्याची शक्यता कमी होईल.