सुशील, राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी : तिघांच्या कोठडीत वाढ
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : जमीन खरेदीसाठी वैष्णवी शशांक हगवणे हिचा छळ करून तिला मारहाण करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर वैष्णवीच्या ९ महिन्यांच्या मुलाचा शोध घेऊन त्याला वैष्णवीचे आई-वडील, कस्पटे कुटुंबियाकडे सोपवण्यात आले.
दरम्यान, प्रसारमाध्यमांतून होत असलेल्या टिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी राजेंद्र तुकाराम हगवणे आणि सुशील राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केली आहे.
न्यायालयाने वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे आणि नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांची पोलिस कोठडी २६ मेपर्यंत वाढवली आहे. सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे अद्याप फरार आहेत.
वैष्णवी आणि शशांक यांचे प्रेमसंबंध असल्याचे लक्षात आल्यानंतर तिचे वडील आनंद कस्पटे यांनी वैष्णवीच्या लग्नात ५१ तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी दिली होती. सनी वर्ल्ड येथे मोठ्या दिमाखात विवाह लावण्यात आला होता.
या विवाहाला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. अजित पवार यांच्या हस्ते वराला फॉर्च्युनर गाडीची चावी देण्यात आली होती. लग्नात इतकी मोठी भेट देण्यात आल्यावर अजित पवार यांनीही आश्चर्य व्यक्त केले होते.
इतक्या मोठ्या प्रमाणावर हुंडा दिल्यानंतरही हगवणे कुटुंबियांची हाव काही संपली नव्हती. शशांक याने जमीन खरेदीसाठी कस्पटे कुटुंबियाकडे २ कोटी रुपयांची मागणी केली होती.
पैसे न दिल्याने वैष्णवीला मारहाण केली जात होती. वैष्णवी माहेरी आल्यावर तिला नेहमी ५० ते १ लाख रुपये दिले जात असत. तरीही तिचे जगणे असह्य झाले होते. वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यावेळी तिच्या अंगावर मारहाणीच्या १९ जखमा असल्याचे शवविच्छेदनात आढळून आले. वैष्णवीचा मृत्यू हा तिने गळफास घेतल्याने झाला की तिला झालेल्या मारहाणीमुळे झाला आणि त्यानंतर तिला गळफास लावण्यात आला, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
तिचा नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे शोधण्यासाठी तिचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून तो रासायनिक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांचा शोध घेत आहेत.
