कस्पटे कुटुंबियांना पिस्तुल दाखवणाऱ्या नीलेश चव्हाणवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वैष्णवी हगवणे हिला मारहाण करून आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी गेल्या ७ दिवसांपासून फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पिता-पुत्रांना बावधन पोलिसांनी गुरुवारी पहाटे स्वारगेट परिसरातून अटक केली.
वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. तेव्हापासून तिचे सासरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे व सुशील हगवणे हे फरार झाले होते.
बावधन पोलिसांनी या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक केली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे फरार असल्याने पोलिसांवर सर्व बाजूंनी टीका होत होती.
दुसरीकडे पोलिस त्यांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना करत होते. अशा वेळी एका हॉटेलमध्ये राजेंद्र हगवणे जेवण करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले. त्यावरून पोलिसांनी शोध घेत स्वारगेट परिसरातून गुरुवारी पहाटे साडेचार वाजता त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, वैष्णवी हगवणे यांच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबियांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकी दिल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नीलेश रामचंद्र चव्हाण (वय ३५, रा. कर्वेनगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबत वैष्णवी यांचे चुलते मोहन कसपटे यांनी फिर्याद दिली आहे. नीलेश चव्हाण हा वैष्णवीची नणंद करिश्मा हिचा मित्र आहे. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे, चुलते मोहन कसपटे, विराज कसपटे आणि त्यांचे मेहुणे उत्तम बहिरट हे सोमवारी वैष्णवी यांच्या मुलाला आणण्यासाठी हगवणे यांच्याकडे गेले होते.
मुलगा चव्हाणकडे असल्याचे समजल्यावर ते सर्वजण त्याला आणण्यासाठी चव्हाण यांच्या घरी गेले. तेव्हा नीलेशने त्यांना पिस्तुल दाखवले. त्याने वारंवार पिस्तुलाला हात लावून “तुमचा आणि मुलाचा काही संबंध नाही, त्यामुळे तुम्ही येथून चालते व्हा,” अशी धमकी दिली.
चव्हाण याच्यावर यापूर्वीही वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पत्नीवर अत्याचार करणे आणि तिला धमकावल्याप्रकरणी पत्नीनेच त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नीलेश चव्हाण याने आपल्या बेडरूममध्ये स्पाय कॅमेरा लावला होता.
त्याद्वारे तो त्यांच्या शारीरिक संबंधांचे चित्रण करत होता. त्याच्या पत्नीने एकदा त्याचा लॅपटॉप पाहिला असता तिला हे व्हिडिओ आढळून आले. तिने नीलेशला जाब विचारल्यावर त्याने तिला धमकावले होते. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली होती.
परंतु, सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. नंतर त्याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. हगवणे कुटुंबाकडून त्यांच्या मोठ्या सुन मयुरी जगताप हिचाही छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, राजकीय दबावामुळे पोलिसांनी तपासाबाबत दिरंगाई केल्याचे दिसून आले आहे.
