महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : माजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कौशल्य विकास केंद्र हे एक मुख्य साधन असून कौशल्यावर आधारित पिढी तयार होण्यासाठी महाराष्ट्रात कौशल्य विकास केंद्रांचे जाळे निर्माण झाले पाहिजे, असे मत राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
जनसेवा फाउंडेशन, पुणे संचलित “हीरा-कांचन” निराधार पुनर्वसन केंद्र येथे “एस. पी. मल्होत्रा कौशल्य विकास केंद्र”चे उद्घाटन उदय सामंत यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
जनसेवा फाउंडेशनच्या कात्रज येथील भिलारेवाडी येथील निराधार केंद्रातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी या कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
यावेळी व्यासपीठावर जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विनोद शहा, सचिव मीना शहा, खजिनदार राजेश शहा, विकफिल्ड उद्योग समूहाचे अश्विनी मल्होत्रा, पुरुषोत्तम लोहिया आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त सागर मोहिते आणि समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांची विशेष उपस्थिती लाभली. राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी जनसेवा फाउंडेशनच्या “एस. पी. मल्होत्रा कौशल्य विकास केंद्रा”ची पाहणी करून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश असून शेतीतूनही मुबलक उत्पादन घेऊन शेतकरी आपला विकास साधू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे वडील आहेत.
शेतीपूरक उद्योगांना कौशल्य विकासाच्या कक्षेत आणल्यास शेतकऱ्यांच्या मुलांना मुबलक संधी उपलब्ध होतील. शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवा कशी करता येते, याचे मूर्तिमंत उदाहरण आज जनसेवा फाउंडेशनच्या “एस. पी. मल्होत्रा कौशल्य विकास केंद्रा”ला भेट दिल्यावर अनुभवता आले, असे गौरवोद्गार सामंत यांनी यावेळी काढले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विनोद शहा यांनी केले. प्रा. जे. पी. देसाई यांनी सूत्रसंचालन केले. जनसेवा फाउंडेशनचे खजिनदार राजेश शहा यांनी आभार मानले.
