विविध विभागांच्या योजनांचा आढावा : आपत्ती व्यवस्थापनावर भर
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : जिल्हाधिकारी किर्ती पुजार यांच्या अध्यक्षतेखाली भूम येथील सावित्रीबाई फुले सभागृहात भूम उपविभागातील मान्सूनपूर्व तयारी व विविध विकास योजनांच्या आढाव्याबाबत बैठक पार पडली.
या बैठकीत प्रामुख्याने मान्सूनपूर्व तयारी, अतिक्रमणमुक्त रस्ते व शेत रस्त्यांच्या योजनांची अंमलबजावणी, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना, वृक्षलागवड, जलतारा योजना आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितु खोखर, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) प्रविण धरमकर, विभागीय वन अधिकारी करे, उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी हिरेमठ, तहसीलदार भूम जयवंत पाटील, तहसीलदार परंडा निलेश काकडे, कृषी अधिकारी व इतर संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस तहसीलदार भूम जयवंत पाटील यांनी प्रस्तावना करत बैठकीचा हेतू व उद्देश स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की, प्रत्येक विभागाने मान्सूनपूर्व आवश्यक तयारी करून ठेवल्यास आपत्ती टाळता येईल.
जिल्हाधिकारी पुजार यांनी मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला. शाळा, अंगणवाड्यांची दुरुस्ती, पुलांच्या कामांवर सूचना फलक लावणे, डेंगू-मलेरिया प्रतिबंधासाठी फवारणी व सर्वेक्षण, तसेच गोगलगाय रोगास प्रतिबंध यावर भर देण्यात आला.
वीज वितरण विभागाने आपले अधिकारी व यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच धरणे, तलाव यांच्यावर आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ‘हरित धाराशिव’ अंतर्गत १९ जुलै २०२५ रोजी जिल्ह्यात १५ लाख वृक्ष लागवड होणार असून, प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान १० आर जमीन लागवडीसाठी तयार करावी, असे निर्देश देण्यात आले.
बचत गट महिला, अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी आणि सर्व विभागीय अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही करण्यात आले. जिल्ह्याचे २००० किलोमीटर शेत रस्त्यांचे उद्दिष्ट असून, ग्रामपंचायतीमार्फत ठराव घेऊन प्रस्ताव सादर करावेत, व या योजनांमध्ये लोकसहभाग नोंदवावा, असेही सांगण्यात आले.
पोलीस अधीक्षक ऋतु खोखर यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक साधनसामग्री, लाईफ जॅकेट्स, रोप्स, किट्स यांची तपासणी करावी व पोलिसांनी आपत्ती काळात बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या उपजिल्हाधिकारी धरमकर यांनी जलतारा योजनेअंतर्गत प्रत्येक एकरासाठी एक खड्डा खोदण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे सांगितले.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची प्रगती, शेत रस्त्यांचे काम, तसेच रेशीम तुती लागवड प्रोत्साहनासाठी अधिकाधिक प्रस्ताव प्राप्त व्हावेत, असे निर्देश देण्यात आले.
बैठकीच्या समारोपप्रसंगी तहसीलदार परंडा निलेश काकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
बैठकीनंतर जिल्हाधिकारी पुजार यांनी तहसील कार्यालय भूम येथे भेट देऊन आपत्ती व्यवस्थापनाच्या साधनांची पाहणी केली व त्याचा वापर प्रत्यक्ष आपत्तीवेळी योग्य पद्धतीने करण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश दिले.
या बैठकीत मान्सूनपूर्व तयारीपासून ते वृक्षलागवड, जलसंधारण, आपत्ती व्यवस्थापन, शेत रस्ते, आरोग्य व शिक्षण या सर्व क्षेत्रांचा समावेश करून एक सुसंगत व कार्यक्षम नियोजन राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने हे उपक्रम निश्चितच यशस्वी होतील, अशी अपेक्षा आहे.
