खोटा रहिवासी पुरावा सादर करून मिळवला होता शस्त्र परवाना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : भुकुम येथे राहत असताना कर्वेनगर आणि कोथरूडमधील मोकाटेनगर येथे राहत असल्याचे दोन वेगवेगळे खोटे रहिवासी पुरावे देऊन शस्त्र परवाना मिळविणाऱ्या हगवणे बंधूंवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांचे मामे सासरे जालिंदर सुपेकर हे आणखी अडचणीत आले आहेत.
शशांक राजेंद्र हगवणे (वय २७) आणि सुशिल राजेंद्र हगवणे (वय २८, दोघे रा. तारागण फार्म्स, मुक्ताई लॉन्स शेजारी, भुकुम ता. मुळशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
या दोघांनी हे खोटे पुरावे देऊन २०२२ मध्ये शस्त्र परवाना मिळविला आहे. त्यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) जालिंदर सुपेकर होते. या अर्जाची खातरजमा करण्याची जबाबदारी प्रशासन म्हणून त्यांचे मामे सासरे जालिंदर सुपेकर यांची होती. विशेष म्हणजे हे दोघे पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत राहत होते.
पुणे ग्रामीण पोलिसांनी शस्त्र परवाना देण्यास त्यांचा अर्ज फेटाळला होता. याबाबत वारजे माळवाडी आणि कोथरूड पोलीस ठाण्यांत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शशांक हगवणे याने आपण कर्वेनगरमधील सरगम कॉलनीतील बिल्डिंग क्र. ४ मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २०३ येथे गेली १० वर्षांपासून राहत असल्याचा खोटा पुरावा १७ ऑक्टोबर ते २२ डिसेंबर २०२२ दरम्यान दिला होता.
तर सुशिल हगवणे याने आपण कोथरूडमधील पौड रोडवरील मोकाटेनगर येथे गेली १० वर्षे राहत असल्याचा खोटा पुरावा शस्त्र परवाना मिळविण्यासाठी २८ सप्टेंबर २०२२ ते ३१ मे २०२३ दरम्यान दिला होता. नवीन शस्त्र परवाना मिळविण्यासाठी केलेल्या अर्जामध्ये खोटी माहिती सादर करून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
















