५ जूनपर्यंत कारवाई न झाल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करू : भाऊसाहेब आंधळकर
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : भगवंत नगरी बार्शीमधील पोस्ट चौक (भवानी पेठ) परिसरात उघडपणे कोंबड्यांची कत्तल व मासे विक्री होत असून, यामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. या प्रकरणी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी बार्शी पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
या परिसरात दोन्ही बाजूंनी पिंजऱ्यांमध्ये कोंबड्या ठेवून त्यांची उघडपणे कत्तल केली जाते. याशिवाय मासे रस्त्यावर मांडून विक्री केली जाते, त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरते. भवानी पेठेतील तुळजा भवानी मंदिर परिसरात नागरिकांची आणि विशेषतः महिलांची सतत वर्दळ असते. या पवित्र धार्मिक परिसरात असा घृणास्पद प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भाऊसाहेब आंधळकर यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित विक्रेत्यांकडे कोणताही वैध परवाना नाही. त्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण करून टपऱ्या उभारल्या असून, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यापूर्वी बार्शी नगरपरिषद व पोलिस प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
“५ जून २०२५ पर्यंत जर योग्य ती कारवाई झाली नाही, तर आम्ही ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करू. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीसाठी प्रशासन जबाबदार राहील,” असा ठाम इशारा भाऊसाहेब आंधळकर यांनी दिला आहे.

















