विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप, सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना गौरव
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, आकुर्डी येथे पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील आठवणींना उजाळा देत भावनिक वातावरण निर्माण केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे होते. उपप्राचार्या डॉ. शिल्पा चौधरी, शैक्षणिक समन्वयक डॉ. देवेंद्र शिरोडे, पदविका विभाग प्रमुख डॉ. आशीष चिंबाळकर, पदव्युत्तर विभाग समन्वयक डॉ. ज्योत्स्ना पाटील आणि कार्यक्रम समन्वयक डॉ. सारिका निकम व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमात “जागतिक हृदय दिन” या विषयावर आधारित टेक्निकल मॅगझिनचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी मॅगझिनचे संपादक डॉ. रमेश काटेदेशमुख, डॉ. पवनकुमार वानखडे, प्रा. काजल भगत आणि प्रा. अबोली मराले उपस्थित होते.
डॉ. नीरज व्यवहारे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मिळालेल्या ज्ञानाचा योग्य वापर करून व्यावसायिक यश मिळवण्याचा सल्ला दिला. “विद्यार्थी हे महाविद्यालयाचे महत्त्वाचे भागधारक असून, माजी विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून संस्थेच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे,” असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील अनुभव कथन करताना, हा प्रवास कधी संपला हे कळलेच नाही, अशी भावना व्यक्त केली. अभ्यासाबरोबरच संस्थेतील विविध उपक्रमांमुळे सर्वांगीण विकास झाला, असे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांच्या आठवणींशी निगडीत एक भावनिक व्हिडिओ सादर करण्यात आला.
कार्यक्रमात डी.फार्मसीमधून आफ्रिन पठाण, बी.फार्मसीमधून मारुफ शिकलगार, तर एम.फार्मसीमधून सिद्धार्थ टोपले यांना “सर्वोत्कृष्ट विद्यार्थी” पुरस्काराने गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वंभरी, समीक्षा, वैभवी आणि श्रीकांत नाईक यांनी केले. यशस्वी आयोजनासाठी साक्षी, वैभवी कुलकर्णी, ऋतुजा साबळे, कोमल गवळी, अर्पिता लाड, मेघना मोरे, कामिनी चौधरी आणि चैताली गायकवाड या विद्यार्थी प्रतिनिधींनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. शुभांगी दसवडकर, डॉ. सारिका निकम आणि प्रा. गायत्री पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.