रामटेकडी परिसरातील निर्जन रस्त्यावर चौघांनी मारहाण करून केली होती लूट : वानवडी पोलिसांची यशस्वी कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : रामटेकडी परिसरात निर्जन रस्त्यावरून जाणाऱ्या एका वयोवृद्ध नागरिकाला अडवून चौघांनी मारहाण करत लुटल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणातील एका चोरट्याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.
उमर नूर खान (वय १८, रा. नवाधिश पार्क, कोंढवा) असे या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेली १५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी जप्त केली आहे. मधुबन सोसायटीकडून हिलसाईड अपार्टमेंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर, टेकडीजवळील निर्जन ठिकाणी १२ डिसेंबर रोजी चौघांनी एका वयोवृद्धास अडवून मारहाण केली व त्याच्याकडील १५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी जबरदस्तीने ओढून चोरली. त्यानंतर ते मोटारसायकलवरून पळून गेले होते.
वानवडी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यातील संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, १८ डिसेंबर रोजी पोलीस अंमलदार विष्णु सुतार, विठ्ठल चोरमले व अभिजित चव्हाण यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वयोवृद्धाला लुबाडणाऱ्या चौघांपैकी एकजण गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळील ओढ्यावरील छोट्या पुलावर कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे.
या माहितीच्या आधारे पोलीस पथक त्या ठिकाणी गेले. त्यांनी तेथे थांबलेल्या तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात १५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी मिळून आली. पोलिसांनी ही सोनसाखळी तसेच अॅक्टिव्हा दुचाकी जप्त केली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि पोलीस निरीक्षक संगिता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख तसेच पोलीस अंमलदार अतुल गायकवाड, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, विष्णु सुतार, विठ्ठल चोरमले, अभिजित चव्हाण, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, आशिष कांबळे, बालाजी वाघमारे, अर्शद सय्यद, पोलीस अंमलदार रुपाली खेडकर व शैला ठेंगल यांनी केली आहे.















