पोलिसांच्या प्रतिउत्तरात गुंड जखमी : वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी होता वाँटेड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : चंदननगरमधील बिडी कामगार वसाहतीतील वाहनांच्या काचा फोडून नुकसान करणाऱ्या सराईत गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. प्रतिउत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हा गुंड जखमी झाला. पोलिसांनी या गुंडावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
ओंकार दिलीप भंडारी (वय २६, रा. बिडी कामगार वसाहत, चंदननगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारी हा सराईत गुंड असून चंदननगर येथील बिडी कामगार वसाहतीच्या मैदानात पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडून ओंकार भंडारी व आदिल रईस मलिक यांनी नुकसान केले होते.
त्यांच्यावर वाहन तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात भंडारी पसार झाला होता. चंदननगर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. शनिवारी सायंकाळी तो आव्हाळवाडी भागात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांचे पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी तेथे रवाना झाले. पोलिसांनी सापळा लावला असता भंडारी एका झुडपात लपलेला होता. त्याने त्याच्याकडील देशी बनावटीच्या पिस्तुलातून पोलिसांवर गोळीबार केला. पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे यांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला.
पोलिसांनी झाडलेली गोळी भंडारीच्या मांडीत शिरल्याने तो जखमी झाला. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांवर गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भंडारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे तपास करत आहेत.
















