सिंहगड रस्त्यावरील घटना : गळ्यातील ३ लाखांची सोनसाखळी हिसकावली
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : अपघात झाल्याची बतावणी करून नुकसानभरपाईच्या नावाखाली कारचालकाला लुटण्यात आल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी परिसरात घडली. दुसऱ्या कारमधील चोरट्यांनी धमकावून तक्रारदार कारचालकाच्या गळ्यातील ३ लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका कारचालकाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोटारचालक हे १४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी भागातून निघाले होते.
त्यावेळी तक्रारदाराच्या कारने दुसऱ्या कारला धडक दिली. त्यानंतर त्या कारमधून चौघेजण उतरले. त्यांनी तक्रारदार कारचालकाला धमकावून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. कारचालकाला धमकावून त्यांच्या गळ्यातील ३ लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव तपास करत आहेत.















