महिलेची जागा बळकाविल्या प्रकरणात खंडणीचा गुन्हा : युनिट ५ च्या पथकाची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सय्यदनगर येथील महिलेची जागा बळकावून ती परत हवी असल्यास २५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टिपू पठाण टोळीतील १३ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.
या टोळीतील दोन गुन्हेगार गेल्या दोन महिन्यांपासून फरार होते. त्यांना गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने जेरबंद केले आहे. साजीद झिब्राइल नदाफ (वय २७, रा. वेताळबाबा वसाहत, गाडीतळ, हडपसर) आणि इरफान नासीर शेख (वय २७, रा. सय्यदनगर, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
याप्रकरणी लौरदेस हॅरीस स्वामी (वय ३१, रा. नौपाडा, मुंबई) यांनी १२ ऑक्टोबर २०२५ रोजी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या आई उसुर्ला हॅरीस स्वामी यांच्या नावावर वारस हक्काने सय्यदनगर येथे १२९० चौरस फुटांची मिळकत होती.
त्या मिळकतीवर त्यांनी पत्र्याचे शेड बांधले होते. मात्र, टिपू पठाण आणि त्याच्या टोळीने या जागेवर अतिक्रमण करून पत्र्याचे शेड पाडून टाकले व तेथे स्वतःचा बोर्ड लावला. तसेच, तेथे नव्याने शेड बांधून ती भाड्याने दिली.
आईच्या निधनानंतर फिर्यादी या जागेवर गेले असता टिपू पठाण याने, “जर तुम्हाला ही मिळकत परत हवी असेल तर २५ लाख रुपये द्या, अन्यथा ही जागा विसरून जा आणि तुम्ही जिथे मुंबईत राहता तिथेच राहा.
या परिसरात पुन्हा दिसलात तर जिवंत परत जाणार नाही,” अशी जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी टिपू पठाणसह त्याच्या १३ साथीदारांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करून मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.
त्यानंतर साजीद नदाफ व इरफान शेख हे दोघे फरार झाले होते. हे दोघे आपल्या घरी येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार गणेश माने, नासेर देशमुख व परमेश्वर कदम यांना मिळाली. या माहितीच्या आधारे वेताळबाबा वसाहत आणि सय्यदनगर येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, तसेच पोलीस अंमलदार गणेश माने, नासेर देशमुख व परमेश्वर कदम यांनी केली आहे.

















