अटीतटीच्या लढतीत १९८ मतांनी विजय : १४ हजारांहून अधिक मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : भूम नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत अलमप्रभू भूम शहर विकास आघाडीच्या संयोगिता गाढवे यांनी १९८ मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीत त्यांनी जनशक्ती भूम शहर विकास आघाडीच्या उमेदवार सत्वशीला थोरात यांचा पराभव केला.
पालिका निवडणुकीसाठी एकूण १८ हजार ७७ मतदारांपैकी १४ हजार ३१८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीअंती संयोगिता गाढवे यांना ७ हजार ८६ मते मिळाली, तर पराभूत उमेदवार सत्वशीला थोरात यांना ६ हजार ८८८ मते प्राप्त झाली.
अपक्ष उमेदवार प्रगती गाढवे यांना २४६ मते, तर नोटाला ९८ मते मिळाली. नगरसेवक निवडणुकीत अलमप्रभू भूम शहर विकास आघाडीचे ६, तर जनशक्ती भूम शहर विकास आघाडीचे १४ नगरसेवक निवडून आले आहेत.
त्यामुळे नगरपालिकेत जनशक्ती आघाडीला बहुमत मिळाले असले तरी नगराध्यक्षपदावर संयोगिता गाढवे यांचा विजय विशेष लक्षवेधी ठरला आहे. ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी रैवायाह डोंगरे, उपजिल्हाधिकारी तथा सहनियंत्रक प्रवीण धरमकर, तहसीलदार जयवंत पाटील, मुख्याधिकारी शैला डाके, तसेच प्रवीण जाधव आणि अमोल नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली.
















