आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कार पार्किंगच्या वादातून तरुणाच्या डोक्यात पंप मारून गंभीर जखमी

maharashtra jain warta • MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, News Slider, Police, Social • June 6, 2025
Spread the love

पुणे : धनकवडीतील बालाजीनगर परिसरात सार्वजनिक रस्त्यावर कार पार्क करण्यावरून झालेल्या वादातून एकाला पंपाने डोक्यात मारून गंभीर जखमी करण्यात आले. याच झटापटीदरम्यान त्या व्यक्तीच्या गळ्यातील अडीच लाख रुपये किंमतीची सोन्याची साखळी हिसकावण्यात आली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

अटक केलेल्या आरोपींची नावे बबलु विवेक कोठारी (वय ३०), लोकेश विवेक कोठारी (वय २१) आणि शाम चांदेकर (वय २१, सर्व रा. काशिनाथ पाटीलनगर, बालाजीनगर, धनकवडी) अशी आहेत.
या प्रकरणी बालाजी महादेव डोंगरे (वय ३८, रा. ग्रीन स्पिरिट सोसायटी, थेरगाव) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना बुधवारी (ता. ४ जून) रात्री सुमारे १०.४५ वाजता बालाजीनगर येथील शितल अपार्टमेंटसमोरील सार्वजनिक रस्त्यावर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डोंगरे हे त्यांच्या सासुला भेटण्यासाठी शितल अपार्टमेंटसमोर गेले होते. कार पार्क करत असताना त्यांचा आरोपींशी वाद झाला. वादाच्या रागातून तिघांनी डोंगरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर बबलु कोठारी याने हवा भरण्याच्या लोखंडी पंपाने त्यांच्या डोक्यात मारहाण केली, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. मारहाणीच्या गोंधळात आरोपींपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील अडीच लाख रुपयांची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील पुढील तपास करीत आहेत.