कॅश शटरला पट्टी लावून करत होते फसवणूक : समर्थ पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : एटीएममधून पैसे बाहेर येतात त्या कॅश ट्रेपास शटरला पट्टी लावून पैसे काढणाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना समर्थ पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
संतोषकुमार किशोरीलाल सरोज (वय २८, रा. पुरे बैसरो, कटरा गुलाब सिंग, ता. व जि. प्रतापगढ, उत्तर प्रदेश) प्रदीपकुमार नंदकिशोर मौर्या (वय २६, रा. मानधाता, ता. व जि. प्रतापगढ, उत्तर प्रदेश)
अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
त्यांच्याकडून रोख रक्कम, वेगवेगळ्या बँकांची ४ एटीएम कार्डे तसेच एटीएम मशीनच्या कॅश शटरला लावलेली काळ्या रंगाची पट्टी जप्त करण्यात आली आहे. रास्ता पेठेतील राज रेस्टॉरंटसमोरील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये ५ जून रोजी रात्री आठ वाजता एक ज्येष्ठ नागरिक पैसे काढण्यासाठी गेले असताना एटीएम मशीनमधून पैसे बाहेर आले नाहीत. त्यामुळे त्यांनी फसवणुकीची तक्रार दिली होती.
यावरून समर्थ पोलिसांनी परिसरात सापळा रचला होता. त्या एटीएममध्ये याआधी आलेल्यांचे सीसीटीव्ही फुटेज बँकेकडून मागवण्यात आले. त्यातून संशयितांचे फोटो पोलिसांना मिळाले होते. त्यामुळे पोलिस त्यांचा शोध घेत होते.
दुसऱ्या दिवशी हे दोघे पुन्हा एटीएम सेंटरमध्ये गेले. तेव्हा ते स्क्रू ड्रायव्हरने एटीएम मशीनशी छेडछाड करत होते. हे बाहेर पाळतीवर थांबलेल्या पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या दोघांना पकडले. चौकशीदरम्यान त्यांनी आजवर अशा प्रकारे अनेक वेळा फसवणूक केल्याचे उघड झाले. यापूर्वी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, सहायक फौजदार संतोष पागार, पोलीस अंमलदार रोहिदास वाघेरे, इम्रान शेख, ओचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश यादव यांनी केली.
अशी होती त्यांची चोरीची मोडस
ते एखादे दुर्लक्षित एटीएम सेंटर पहात. एटीएमच्या ज्या भागातून पैसे बाहेर येतात, तेथे हे आरोपी लोखंडी पट्टी लावत असत़ पैसे बाहेर न आल्याने बँक ग्राहक तांत्रिक बिघाड असेल, असे समजून एटीएममधून निघून जात. त्यानंतर काही वेळाने हे दोघे पुन्हा त्या एटीएममध्ये जाऊन लोखंडी पट्टी सरकवून तेथे आलेले पैसे घेऊन लंपास होत असत. ज्येष्ठ नागरिकाने तातडीने फिर्याद दिल्याने पोलिसांनी पाळत ठेवून या दोघांना पकडल्याचे समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.















