महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी येथील भवानी पेठ, सोलापूर रोडवरील व्ही. के. मार्टजवळ एका क्रेनच्या धडकेत भगवान कोंडलकर (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. या अपघातामुळे बार्शी परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भगवान कोंडलकर हे भवानी पेठ, सोलापूर रोडवरून पायी चालत जात असताना एका क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली व पोलिसांना तातडीने माहिती दिली. बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, वाहतूक शाखेचे पोउनि महेश गळगटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
क्रेनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, क्रेन ताब्यात घेण्यात आली आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.
या घटनेमुळे कोंडलकर कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. स्थानिक नागरिकांनी रस्त्यांवर गतिरोधक बसवावेत आणि इतर सुरक्षितता उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळता येतील.
