आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पैशांचा तगादा लावल्यामुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

maharashtra jain warta • MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, News Slider, Police, Social • June 13, 2025
Spread the love

पुणे : प्रेमसंबंधातून घर घेण्यासाठी २७ लाख रुपये दिल्यानंतरही पैशांसाठी तगादा लावल्यामुळे, तसेच फोटो आणि रेकॉर्डिंग व्हायरल करून आयुष्य बरबाद करण्याची धमकी दिल्याने एका तरुणाने संबंधित तरुणीसमोर गळफास घेऊन आत्महत्या केली.

कार्तिक बाबू शेट्टियार (वय ३४, रा. राज टॉवर, संतोषनगर, कात्रज) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी साक्षी बाळू वाघचौरे (वय २३, रा. वारजे) या तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वडगावमधील नवले पुलाजवळील इंडिया गेट लॉजमध्ये ३० एप्रिल २०२५ रोजी पहाटे सव्वा दोन वाजता घडली होती.

या प्रकरणी कार्तिकचा भाऊ तंगराज बाबू शेट्टियार (वय ३८, रा. राज टॉवर, संतोषनगर, कात्रज) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचा भाऊ कार्तिक शेट्टियार हा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता.

कार्तिकची साक्षी हिच्याशी ओळख १३ ऑक्टोबर २०२४ रोजी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी झाली होती. फेब्रुवारी २०२५ पासून त्यांच्यात जवळीक वाढली. साक्षीचा फोन आला की कार्तिक तात्काळ घरातून निघून जाई आणि दुसऱ्या दिवशीच घरी परत येई. तो घरातून बाहेर न गेल्यास साक्षी ही त्याच्या भावास गाडीजवळ उभी असल्याचा सेल्फी फोटो पाठवत असे.

१४ एप्रिल २०२५ रोजी कार्तिकचा मित्र मयूर बांदल याने फिर्यादीला सांगितले की, तो आणि कार्तिक दोघे इंदापूर येथे साक्षीला आणण्यासाठी गेले होते. यावेळी साक्षी हिने, “तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस, मला घर हवे आहे, त्यासाठी पैसे दे,” असा तगादा लावला होता.

कार्तिकच्या सांगण्यावरून मयूर बांदल याने तिला १५ लाख रुपये रोख दिले. सिद्धेश अनिल मुथा याने ५० हजार रुपये, कालीदास मगर याने १० लाख रुपये, तर ऋषिकेश शिरगावकर याने २० एप्रिल २०२५ रोजी इंडिया गेट लॉजवर एक साडी व २ लाख रुपये पाठविले होते.

कार्तिक एकदा घरी असताना त्याला व्हिडिओ कॉल आला होता. त्या कॉलवर एक महिला बोलत होती. फिर्यादींच्या मुलीने विचारले की ही कोण आहे, तेव्हा कार्तिक म्हणाला, “ती माझी मैत्रीण आहे. ती भेटण्यासाठी आणि पैशांसाठी त्रास देते. तिच्या त्रासामुळे जीवाचे काही बरेवाईट करावेसे वाटते.” यावर घरच्यांनी त्याला समजावले होते.

यानंतर ३० एप्रिल रोजी पहाटे साडेतीन वाजता, चेन्नईला असताना, कार्तिकचा मित्र तेजस राऊत याने फोन करून सांगितले की, कार्तिकने इंडिया गेट लॉजमध्ये ओढणीने गळफास घेतला आहे.
कार्तिकच्या आत्महत्येस साक्षी जबाबदार असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत दाईगडे तपास करत आहेत.