आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रिक्षा लावण्याच्या वादातून रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला

Spread the love

पुणे : रिक्षा स्टँडवर रिक्षा लावण्यावरून झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून तिघा रिक्षाचालकांनी एका रिक्षाचालकावर हत्याराने वार करून गंभीर जखमी करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. विश्रांतवाडी पोलिसांनी दोघा रिक्षाचालकांना अटक केली आहे.

नरेश रामचंद्र तिडंगे (वय ४०, रा. विश्रांतवाडी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी परशुराम राजू माणिके (वय २१) व नागेश माणिके (वय १९, दोघे रा. भिमनगर, विश्रांतवाडी) यांना अटक केली असून त्यांच्या एका साथीदारावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार धानोरीतील साईधाम सोसायटी येथे ११ जून रोजी रात्री सव्वा आठ वाजता घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे दोघेही रिक्षाचालक आहेत. ११ जून रोजी सायंकाळी रिक्षा स्टँडवर रिक्षा लावण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता.

त्यानंतर नरेश तिडंगे हे प्रवासी घेऊन धानोरी येथील साईधाम सोसायटीत गेले होते. प्रवाशाला सोडल्यानंतर परत येत असताना वाटेत तिघांनी त्यांना गाठले. सायंकाळी झालेल्या वादाच्या रागातून त्यांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हत्याराने त्यांच्या हातावर, पायावर आणि शरीरावर इतरत्र वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पदमराज गंपले करत आहेत.