गुणवत्तापूर्ण शिक्षण व मूल्याधिष्ठित नेतृत्व घडविण्याची दखल
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचा प्रतिष्ठित सकाळ एज्युकेशन एक्स्पो २०२५ दरम्यान महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
७ जून २०२५ रोजी पार पडलेल्या या भव्य शैक्षणिक महोत्सवात सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या कार्याची विशेष दखल घेत डॉ. चोरडिया यांचा सत्कार करण्यात आला. मा. मंत्र्यांनी सूर्यदत्तच्या स्टॉलला भेट देत संस्थेच्या उपक्रमांची माहिती घेतली.
त्यांनी सूर्यदत्तच्या कार्यसंस्कृतीचे आणि कार्यक्षम टीमचे कौतुक करत, “सूर्यदत्त ही राष्ट्राभिमानी, बौद्धिक आणि सामाजिक जबाबदारी स्वीकारणारे विद्यार्थी घडवणारी जागतिक संस्था आहे,” असे गौरवोद्गार काढले.
यावेळी डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्त येथे आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांना सक्षम बनवणाऱ्या आणि जबाबदार, प्रगतीशील समाजाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या उपक्रमांना प्राधान्य देतो. शिक्षण क्षेत्रातील आमची वचनबद्धता आणि नवोपक्रमच विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात निर्णायक ठरतात.”
या प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि प्रेरणा देणारे अद्वितीय व्यासपीठ उपलब्ध झाले. या गौरवाने सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या कार्यास अधिक बळ मिळाल्याची भावना यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.
