आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भाजप पदाधिकारी ओंकार कदमवर गुन्हा दाखल

maharashtra jain warta • MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, News Slider, Police, Social • June 18, 2025
Spread the love

पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका महिला अधिकाऱ्याचा पाठलाग, तसेच अवमानास्पद टिप्पणी करून मानसिक त्रास दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे पदाधिकारी ओंकार कदम याच्यासह सहा जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संबंधित महिला अधिकाऱ्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ओंकार कदम, अक्षय कांबळे यांच्यासह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कदम आणि त्याच्या साथीदारांनी कोणतेही शासकीय काम नसताना आरोग्य विभागाच्या कार्यालयात प्रवेश केला.

कार्यालयीन सहकारी उपस्थित असताना त्यांनी अवमानास्पद टिप्पणी केली, अश्लील शब्द उच्चारले. कदम आणि सहकाऱ्यांनी पाठलाग केला. त्यांच्या कृत्यामुळे मानसिक त्रास झाला असून कार्यालयात जाण्यास भीती वाटत आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

या महिला अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या आयुक्तांना याबाबत पत्र लिहून माहिती दिली होती. परंतु तत्कालीन महापालिका आयुक्त भोसले यांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यानंतर महिला अधिकाऱ्यांनी राज्य महिला आयोगाला पत्र पाठवले.

आयोगाने याची दखल घेत महापालिकेला पत्र पाठवले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी ओंकार कदम आणि त्याच्या साथीदारांना महापालिका भवन आणि महापालिकेशी संबंधित सर्व मिळकतींमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

महापालिकेच्या कारवाईनंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. अखेर मंगळवारी रात्री उशिरा ११ वाजता जामिनपात्र कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.