आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पालखी सोहळ्यात सापडलेली १० तोळ्यांची सोन्याची चैन केली परत

Spread the love

पुणे : आळंदीतील पालखी सोहळ्यादरम्यान हरवलेली १० तोळ्यांची सोन्याची चैन कांचन येळवंडे यांनी प्रामाणिकपणे पोलिसांकडे सुपूर्त केली. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी पुणे मुक्कामाकडे प्रस्थान झाले. माऊलींना निरोप देण्यासाठी आळंदीतील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. याच गर्दीत मॅगझीन चौक, दिघी येथे एक अनपेक्षित घटना घडली.

कळंबोली, मुंबई येथून आलेले भाविक शैलेंद्र पाटील यांच्या गळ्यातील १० तोळ्यांची सोन्याची चैन चोरट्याने चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, चैन खाली पडली आणि चोरट्याचा प्रयत्न फसला. ही चैन भाजप आळंदी शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या पत्नी कांचन येळवंडे यांच्या नजरेस पडली.

त्यांच्या सोबत सविता आहेर, धनश्री पराग राळे आणि मोहिनी वाघ या महिला उपस्थित होत्या. कांचन येळवंडे यांनी कोणताही विलंब न करता दिघी पोलीस ठाण्यात जाऊन चैन जमा केली. त्याच वेळी शैलेंद्र पाटील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी आले होते. हरवलेली चैन परत मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

“माऊलींच्या कृपेने कांचन यांच्या रूपाने माझी चैन परत मिळाली,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या घटनेनंतर कांचन येळवंडे यांच्या प्रामाणिकपणाचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिघी पोलिसांनीही घटनेची नोंद घेऊन त्यांचे आभार मानले. पालखी सोहळ्यासारख्या पवित्र प्रसंगी दाखवलेली ही प्रामाणिकता समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.