९० हजार ‘ॐ’ जप, ९८ मिनिटे योग – ९०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग : विश्वविक्रमाची नोंद
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, बावधन येथे ‘सूर्य योग ध्यानाथॉन २०२५’ या अद्वितीय आणि विश्वविक्रमी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. “समग्र आरोग्यासाठी शरीर आणि मनाचा ताल” या संकल्पनेवर आधारित, मौन पाळत आणि सामूहिक सहभागाने साकारलेला हा कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या एकात्मतेचा आणि योगाभिमुखतेचा उत्कृष्ट नमुना ठरला.
बन्सीरत्न सभागृहात पार पडलेल्या या उपक्रमात संस्थेच्या विविध शाखांमधील ९०० पेक्षा अधिक विद्यार्थी, प्राध्यापक, माजी विद्यार्थी, पालक आणि कर्मचारी सहभागी झाले. सलग ९८ मिनिटे त्यांनी सूर्यनमस्कार, योगासने आणि सामूहिकरीत्या तब्बल ९०,००० वेळा ‘ॐ’ जप करून एक विश्वविक्रम प्रस्थापित केला.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘वन अर्थ, वन हेल्थ’ विषयावर आधारित ऑनलाईन ‘भक्तियोग’ सत्राने झाली. यानंतर सानिया पाटणकर व त्यांच्या टीमने सादर केलेल्या सुफळ संगीत प्रार्थनेमुळे वातावरण आध्यात्मिकतेने भारावून गेले.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी सूर्यनमस्कार स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. यामध्ये गार्गी झरे (प्रथम), सेजल विटेकर (द्वितीय), अनुज शिंगोळे (तृतीय), संभाजी घोले (चतुर्थ) व नीरज बुब (पंचम) यांनी अनुक्रमे पारितोषिके पटकावली.
सूर्यदत्ततर्फे दरवर्षी योग दिनानिमित्त आगळेवेगळे उपक्रम राबवले जातात. ‘कला आरोग्यम योगाथॉन २०२१’, ‘ताल आरोग्यम योगाथॉन २०२२’, ‘सिद्धमंत्र हास्य क्युरेटिव्ह योगाथॉन २०२३’ आणि ‘सूर्यदत्त योगवारी आरोग्याथॉन २०२४’ या आधीच्या कार्यक्रमांप्रमाणे यंदाच्या ‘सूर्य योग ध्यानाथॉन २०२५’ या उपक्रमालाही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव मिळाला.
एकात्मता, ध्यान आणि आत्मिक शुद्धी यांचे प्रतीक म्हणून सामूहिक ‘ॐ’ जपाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाची दखल अनेक विक्रम संस्थांनी घेतली असून सूर्यदत्तला १२ पेक्षा अधिक प्रमाणपत्रांनी सन्मानित करण्यात आले.
संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी कार्यक्रमातील सर्व सहभागींचे अभिनंदन करताना सांगितले, “योगामुळे शरीर आणि मन यामधील संतुलन राखले जाते. नियमित योग, संतुलित आहार आणि सकारात्मक विचार यांच्या सहाय्याने आपण आरोग्यसंपन्न आणि सशक्त व्यक्तिमत्त्व निर्माण करू शकतो.
योग ही भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी आहे आणि ती जीवनशैलीचा भाग बनवणे हे काळाची गरज आहे.” या कार्यक्रमाच्या तयारीसाठी गेल्या एक महिन्यांपासून विद्यार्थ्यांनी संगीत, साधना आणि योग यांचा संगम साधला होता.
सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “सामूहिक जपामुळे अंतर्मुखता आणि आत्मिक एकरूपतेचा अनुभव मिळाला. योग हा केवळ व्यायाम नसून, तो जीवन जगण्याची कला आणि शांतीकडे नेणारा मार्ग आहे.”
या अद्वितीय उपक्रमामुळे सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने योग, आरोग्य आणि भारतीय मूल्यांचा जागतिक स्तरावर प्रचार करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
