राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे : स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशन तर्फे पुरस्कार वितरण सोहळा
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : कोणताही व्यवसाय असला तरी त्यामध्ये चढ-उतार येत असतात. अशावेळी आपण खचून न जाता धैर्याने सामोरे गेले पाहिजे. ग्राहकांशिवाय व्यापार होऊ शकत नाही. त्यामुळे ग्राहक आकर्षित करण्यासाठी त्याला सर्वप्रथम व्यावसायिकांविषयी विश्वासार्हता वाटली पाहिजे. विश्वासा शिवाय कोणत्याही व्यापारामध्ये यश मिळू शकत नाही, अशी भावना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली.
स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशन तर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यापाऱ्यांना एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
आमदार हेमंत रासने, असोसिएशनचे अध्यक्ष सचिन जोशी, उपाध्यक्ष संजय राठी, सचिव किशोर पिरगळ, खजिनदार मोहन कुडचे, तसेच पदाधिकारी सूर्यकांत पाठक, अरविंद पटवर्धन, सुरेश नेऊरगांवकर, मदनसिंह राजपूत, नितीन पंडीत, मोहन साखरिया, किशोर चांडक, अनिल प्रभुणे, धनंजय रामलिंगे, राजकुमार गोयल, सुनिल शिगवी, मनिष परदेशी, राजेश गांधी आदी उपस्थित होते.
व्यापार भूषण पुरस्कार मार्केटयार्डमधील राजेंद्र कुमार मोहनलाल आणि कंपनीचे राजेंद्र बांठिया यांना प्रदान करण्यात आला. व्यापार भूषण पुरस्काराचे स्वरुप पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे होते.
तसेच उत्कृष्ट दुकान पुरस्कार पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल तिरंगा चे चंद्रकांत आदमाने, उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार लक्ष्मी रस्त्यावरील जनता खादी भांडारचे श्रीनिवास शाम जन्नू, फिनिक्स पुरस्कार तुळशीबागेतील अमृता कलेक्शनचे किरण चौहान आणि उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार लक्ष्मी रस्त्यावरील त्रिंबक मोरेश्वर आणि कंपनीच्या सुनिता गोंधळेकर यांना प्रदान करण्यात आला.
याशिवाय कै. डॉ. धनंजय व साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार नारायण पेठेतील चाय दरबारच्या ऐश्वर्या शेलार आणि कांचन जांभळे यांना देण्यात आला. या पुरस्कारांचे स्वरुप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, श्रीफळ असे होते.
हरिभाऊ बागडे म्हणाले, जग बदलत आहे, त्याचप्रमाणे तंत्रज्ञानातही बदलत आहे. या तंत्रज्ञानाचा आपल्या उद्योगांमध्ये आपण कसा वापर करून घेऊ शकतो, हे कायम व्यापाऱ्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे. व्यापार ज्याप्रमाणे तंत्रज्ञानावर चालतो, त्याचप्रमाणे विश्वास कमावणे आणि ते टिकवणे गरजेचे आहे.
ग्राहकांचा विश्वास असेल तर व्यापाराचा विस्तार करण्यासही मदत होते. त्यामुळे व्यवसायिकांनी विश्वासाने माणसे कमावली, तर आपोआपच व्यवसायही मोठा होतो. आमदार हेमंत रासने म्हणाले, स्टेशनरी कटलरी असोसिएशन या संस्थेने सामाजिक भान ठेवून सर्व व्यापाऱ्यांना एकत्र केले आहे.
आपल्या पैशाचा वापर समाजाच्या विकासासाठी व्हावा, ही एक नैतिक भावना घेऊन या संस्थेची वाटचाल सुरू आहे. ही भावना मनात ठेवून त्यांनी विविध क्षेत्रातील माणसे जोडली आहेत. स्टेशनरी आणि कटलरी असोसिएशन या संस्थेप्रमाणेच सामाजिक भावना जपत इतर संस्थांनी ही कार्यरत केल्यात निश्चितच समाजाची प्रगती होऊ शकेल.
सूर्यकांत पाठक म्हणाले, हरिभाऊ बागडे यांचा सर्वसामान्य कुटुंबातील ग्रामीण भागातील गरीब व्यक्तीपासून राजस्थानच्या राजभवनापर्यंतचा प्रवास तरुणांना निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. राजकीय क्षेत्रामध्ये यशस्वी होऊनही, त्यांनी मूळची साधी राहणी आणि उच्च विचार हे तत्व सोडलेले नाही. त्यामुळेच ते आजही जनतेच्या मनामध्ये घर करून आहे.
पुरस्काराला उत्तर देताना राजेंद्र बाठीया म्हणाले, आई-वडिलांचे संस्कार आणि शिक्षकांनी दिलेले शिक्षण यामुळे मी व्यवसायात प्रगती करू शकलो. प्रामाणिकपणा ग्राहक सेवा आणि कष्ट यात्री सूत्र माझ्या यशाची वाटचाल आजही सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
