खडकी शिक्षण संस्थेच्या नूतन शैक्षणिक वर्ष प्रारंभ सभेत महत्त्वपूर्ण संदेश
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : खडकी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे भविष्य हे निश्चितच उज्ज्वल असणार आहे, कारण काळानुरूप बदल स्वीकारत संस्थेने विविध नवे अभ्यासक्रम सुरू केले असून, आधुनिक सुविधांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना आयोजित विशेष सभेत संबोधित करताना कृष्णकुमार गोयल यांनी ही माहिती दिली.
ते पुढे म्हणाले, “ही संस्था माझी आहे आणि मी संस्थेचा आहे. विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य हेच माझे ध्येय आणि संपत्ती आहे. प्रत्येकाने हाच भाव मनात ठेवून काम केले पाहिजे. आपली संस्था ही चांगल्या कामांची दखल घेणारी असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याची जबाबदारी संस्थेची आहे. मात्र त्या विद्यार्थ्यांना सुसंस्कृत, जबाबदार नागरिक बनवण्याचे कार्य शिक्षकांनी पार पाडावे.”
सद्य:स्थितीत संस्थेच्या सर्व वर्गांमध्ये इंटरऍक्टिव्ह बोर्ड्स, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा केंद्र, रायफल शूटिंग रेंज आणि रेडिओ सेंटर आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थी हे उपयोगी व जबाबदार घटक बनावेत, यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असेही गोयल यांनी नमूद केले.
या प्रसंगी संस्थेचे सचिव आनंद छाजेड यांनी, डेटा सायन्स, अॅनिमेशन, एआय (AI), नाट्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा केंद्र यांसारख्या अभ्यासक्रमांची सुरुवात झाल्याची माहिती दिली. सर्व कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत, विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी नियोजनबद्ध व शिस्तबद्ध काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
संस्थेचे सहसचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी आभारप्रद भाषणात महाविद्यालयास ऑटोनॉमस दर्जा प्राप्त झाल्याची माहिती दिली. नवीन उपक्रमांसाठी संस्थेच्या वतीने सर्वांचे स्वागत आहे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष अनिल मेहता, सचिव आनंद छाजेड, सहसचिव सुरजभान अगरवाल, संचालक ॲड. अजय सूर्यवंशी, रमेश अवस्थी, राजेंद्र भूतडा, ज्ञानेश्वर मुरकुटे, मधुकर टिळेकर, सुधीर फेंगसे, कमलेश पंगुडवाले तसेच प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
