आठ महिन्यांत नवीन इमारत : आयएसओ बहुमान मिळविणारे राज्यातील पहिलेच पोलीस ठाणे
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सात नवीन पोलीस ठाण्यांची घोषणा केली होती. त्यातील आंबेगाव पोलीस ठाण्याने केवळ आठ महिन्यांत स्वतःची अत्याधुनिक इमारत उभी केली.
आता आयएसओ ९००१ : २०१५ हे मानांकन मिळवले आहे. पोलीस ठाण्याच्या स्थापनेनंतर इतक्या कमी वेळेत आयएसओ मानांकन मिळविणारे हे राज्यातील पहिले पोलीस ठाणे ठरले आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते आंबेगाव पोलीस ठाण्याला मिळालेले आयएसओ ९००१ : २०१५ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
आंबेगाव पोलीस ठाण्याची स्थापना ३० ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात आली. सहा महिन्यांत पोलीस ठाण्याची सुसज्ज नवीन इमारत उभारण्यात यश मिळाले. या नवीन इमारतीचे उद्घाटन गेल्या महिन्यात, २३ मे रोजी करण्यात आले. त्यापाठोपाठ पोलीस ठाण्यात अभिलेख नोंदवण्याकरिता सुसूत्रता निर्माण झाली आहे.
नागरिकांना दर्जेदार व उत्तम पोलीस सेवा मिळत आहे. आयएसओ ९००१ : २०१५ प्रमाणपत्रामुळे पोलिसांना कामात स्फूर्ती तसेच प्रेरणा मिळणार आहे. पोलिसांवरील कामाचा ताण कमी झाला आहे. आयएसओ ९००१ : २०१५ प्रमाणपत्र हे आंबेगाव पोलीस ठाण्याच्या जनसेवेच्या वचनबद्धतेचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
या आयएसओ ९००१ : २०१५ प्रमाणपत्र प्रदान सोहळ्यास पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले यांच्यासह आंबेगाव पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
