३ जुलै रोजी भूममध्ये शांततेत भव्य ‘अमृत २ योजना बचाव रॅली’चे आयोजन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या अमृत २ योजनेच्या तात्काळ अंमलबजावणीसाठी पाणी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या पार्श्वभूमीवर ३ जुलै गुरुवारी भूम शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या रॅलीसाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग अपेक्षित आहे.
अमृत २ ही योजना भविष्यातील शहरवासीयांच्या पाणीपुरवठ्याच्या गरजा लक्षात घेता अत्यंत आवश्यक आहे. या योजनेंतर्गत दररोज नियमित पाणीपुरवठा, हद्दवाढ भागांतील पाणी प्रश्नांचे निराकरण, तसेच शहरातील कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे उच्च दाबाने रूपांतर करण्याचा उद्देश आहे.
पाणी कृती समितीच्या वतीने गोलाई चौक येथे शांततेच्या मार्गाने कोणत्याही प्रकारचा बंद किंवा रस्ता रोको न करता रॅली काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधून योजना तातडीने राबवण्याची मागणी केली जाणार आहे.
या योजनेविरोधात काही विरोधक सातत्याने अडथळे निर्माण करत असल्यामुळे, प्रशासनाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने ही योजना त्वरीत पूर्ण करावी व भूमकरांना तातडीने पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी समितीने निवेदनात केली आहे.
ही रॅली सकाळी ११ वाजता मेहंतीशावली मैदानापासून सुरू होऊन वीर सावरकर चौक, महात्मा गांधी चौक, नागोबा चौक, ओंकार चौक मार्गे गोलाई चौकात समाप्त होणार आहे. या ठिकाणी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
रॅलीस पाणी कृती समितीचे अध्यक्ष दिलीप गाढवे आणि माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना दिलीप गाढवे, ॲड. पंडित ढगे, रोहन जाधव, नारायण वरवडे, भागवत शिंदे, रंजीत साळुंखे, डॉ. रामराव कोकाटे, अमोल भोसले, प्रभाकर हाके, पोपट जाधव, योगेश आसलकर, तोफिक कुरेशी, संजय होळकर, अरुण देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
