सायबर चोरट्यांना बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या ५ जणांना अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांना बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश सायबर पोलिसांनी केला आहे. या टोळीतील नेपाळी तरुणांसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. भारतातील तसेच भारताबाहेरील सायबर चोरट्यांसाठी ही टोळी कार्यरत होती. मागील ४ ते ५ महिन्यांपासून हे रॅकेट सुरु असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.
अनिकेत प्रशांत भाडळे (वय २७, रा. शिवाजीनगर गावठाण), नोरबु शेर्पा (वय २८), अंग नुरी शेर्पा (वय २७, दोघेही रा. नेपाळ), सागर मच्छिंद्र गायकवाड (वय २६, रा. गणेशमळा, सिंहगड रोड), शिवतेज अशोकराव गुंजकर (वय ३३, रा. आंबेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या टोळीकडून १० मोबाईल फोन, १० पेनड्राईव्ह, बँकेचे स्वाईप मशीन, ४ लॅपटॉप, ५३ बँकांचे डेबिट कार्ड्स, १७४ विविध कंपन्यांची सिमकार्ड्स, ५५ बँकांची चेकबुक्स, ३९ कंपन्यांचे शिक्के, २७ मोकळी चेक्स, ४ हार्ड डिस्क, २७ क्यूआर कोड्स. असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
शहरातील एका नागरिकाला एका कंपनीमार्फत ऑनलाइन शेअर ट्रेडिंग केल्यास मोठा फायदा होईल, असे प्रलोभन दाखवले गेले. विविध कंपन्यांचे शेअर्स आणि आयपीओ खरेदी करण्याच्या बहाण्याने त्याच्याकडून ६० लाख २० हजार रुपये उकळण्यात आले. याबाबत १९ एप्रिल २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या फसवणुकीतील पैशांपैकी १४ लाख ३० हजार रुपये ‘एयू स्मॉल फायनान्स बँक’च्या खात्यात वर्ग करण्यात आले होते. हे खाते ‘आदियोगी स्क्रॅप अॅन्ड वेस्ट मॅनेजमेंट एलएलपी’, शिवणे येथील असल्याचे समजले.
त्यानुसार कंपनीचा संचालक अनिकेत भाडळे याला सायबर पोलिसांनी अटक केली. चौकशीत समोर आले की त्याचे बँक खाते सिंहगड रोड येथील कार्यालयातून ‘आकाश’ नावाचा व्यक्ती वापरत होता. यानंतर या गुन्ह्यातील काही नेपाळी आरोपी नऱ्हे येथील हॉटेलमध्ये राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी उर्वरित चार जणांना अटक केली.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त विवेक मासाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त मच्छिंद्र खाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलिस निरीक्षक संगिता देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संदेश कर्णे, पोलीस अंमलदार प्रविणसिंग राजपूत, राजुदास चव्हाण, अमर बनसोडे, जान्हवी भडेकर, नवनाथ कोंढे, सचिन शिंदे, अनिकेत भिंगारे, आदनान शेख, श्रीकृष्ण नागटिळक, अमोल कदम, संदीप पवार, सतीशकुमार मांढरे, संदीप मुंढे, संदीप यादव, कौशल्या भांगिरे, नीलम नाईकरे यांनी केली आहे.
असे चालत होते रॅकेट – हे सर्व जण सायबर चोरट्यांना पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बँक खाती उपलब्ध करून देत होते. अनिकेत भाडळे याने एक बनावट कंपनी तयार केली होती. त्याने आपल्या कंपनीचे चालू बँक खाते सायबर चोरट्यांना वापरण्यास दिले होते, त्याबदल्यात त्याला पैसे मिळत होते.
नेपाळी आरोपी नोरबु आणि अंग नुरी हे दोघे शहरातील एका हॉटेलमध्ये थांबवून, इतर आरोपींच्या मदतीने लोकांची बँक खाती गोळा करत होते. संबंधित व्यक्तींच्या मोबाईलवर एक विशिष्ट डिव्हाईसद्वारे नियंत्रण मिळवून, त्या खात्यांद्वारे फसवणुकीचे पैसे ट्रान्सफर केले जात होते. सायबर पोलिसांच्या तपासात एक मोठी साखळी या प्रकरणात कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
