८०० सीसीटीव्हींचा मागोवा घेऊन अटक : हडपसर पोलिसांनी ३७ लाखांचा माल केला जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सहकुटुंब तुळजापूर, अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी गेले असताना चोरट्यांनी घरफोडी करून ३८ लाख ८८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपी शहराच्या बाहेर लवळेपर्यंत गेले. मात्र, तरीही ते पोलिसांना चुकवू शकले नाहीत. हडपसर पोलिसांनी पुणे शहर व लवळे परिसरातील सुमारे ८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मागोवा घेऊन या चोरट्यांपर्यंत पोहोचले.
गणेश अर्जुन पुरी (वय ३३, रा. सध्या ग्रीनवुड सोसायटी, मांजरी; मूळ रा. लातूर), रविसिंग शामसिंग कल्याणी (वय २७, रा. रामटेकडी, हडपसर) आणि निरंजनसिंग भारतसिंग दुधाणी (वय ४४, रा. वांगणी, ता. अंबरनाथ, जि. ठाणे) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सोनल निकित कोद्रे (वय ४०, रा. सेजल गार्डन, हडपसर) या १४ जून रोजी पहाटे ५ वाजता कुटुंबासह तुळजापूर, अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघाल्या होत्या. त्याच दिवशी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घरकाम करणाऱ्या महिलेने फोन करून घरात चोरी झाल्याचे सांगितले.
चोरट्यांनी घरातील लाकडी कपाटातील दागिने व रोख रक्कम असा एकूण ३८ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास करताना सोसायटीतील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.
आरोपींनी वापरलेली कार फुटेजमधून आढळून आली. पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागातील ८०० पेक्षा जास्त सीसीटीव्हींचा मागोवा घेतला गेला. तपासात आरोपी लवळे भागात गेले असल्याचे स्पष्ट झाले.
त्या आधारावर उपयुक्त माहिती मिळाल्यानंतर गणेश पुरी याला अटक करण्यात आली. त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर रविसिंग कल्याणी व निरंजनसिंग दुधाणी यांना अटक करण्यात आली.
आरोपींनी गुन्हा करण्यासाठी टाटा नेक्सॉन गाडीचा वापर केला होता. ही गाडी आरोपीच्या भावाने सुमारे ८–१० महिन्यांपूर्वी “विकत घेतो” असे सांगून घेतली होती, मात्र नावावर केली नव्हती. आरोपींनी नेक्सॉन गाडीशी मिळतीजुळती आरटीओ नंबर प्लेट तयार करून ती गाडीला लावली होती. तपासामध्ये माग लागू नये म्हणून आरोपी घरफोडी करून लवळेपर्यंत गेले होते.
त्यांच्याकडून हडपसरमधील २, कोरेगाव पार्क आणि संभाजीनगर येथील सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी १, अशा एकूण ४ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून आतापर्यंत २२ लाख ५० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, १४ लाख ५० हजार रुपयांची नेक्सॉन गाडी, हंटर मोटारसायकल असा एकूण ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दीपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निलेश किरवे, बापू लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजित राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलिक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महावीर लोंढे, नामदेव मारटकर, माऊली चोरमले, माधव हिरवे, अमोल जाधव यांनी केली आहे.
