ज्येष्ठांबरोबर एटीएम कार्ड अॅक्टिव्हेट करण्याच्या नावाखाली तरुणाला घातला गंडा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या नावाखाली हातचलाखीने कार्ड बदलून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचवेळी एटीएम कार्ड अॅक्टिव्हेट करून देण्याच्या नावाखाली चोरट्याने एका तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत वाघोली येथील एका ३१ वर्षीय तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना तुळशीबाग येथील महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये ३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता घडली.
फिर्यादी हे पत्नीच्या नवीन एटीएम कार्डचा पिन अॅक्टिव्हेट करण्यासाठी एटीएममध्ये गेले होते.
तेथे आधीपासून असलेल्या एका तरुणाने एटीएम कार्ड अॅक्टिव्हेट करून देण्याच्या बहाण्याने ते कार्ड घेतले. कार्ड अॅक्टिव्हेट करून परत देताना त्याने हातचलाखीने दुसरे कार्ड दिले. त्यानंतर त्या खात्यातून २९ हजार ४०० रुपये काढून तरुणाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे करत आहेत.
दुसरी घटना शंकरशेठ रोडवरील एका बँकेच्या एटीएममध्ये २ जुलै रोजी घडली. याबाबत नाना पेठेतील ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हे ज्येष्ठ नागरिक दुपारी एटीएममध्ये गेले होते. त्यांच्या पाठोपाठ एक चोरटा एटीएममध्ये शिरला.
त्याने मदतीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांकडून डेबिट कार्ड आणि पासवर्ड घेतला. मात्र, त्यांच्या कार्डाचा वापर न करता, चोरट्याने स्वतःच्या डेबिट कार्डाचा वापर केला. पैसे न आल्याचे भासवून तांत्रिक बिघाड असल्याचा बनाव केला. त्यानंतर त्याने स्वतःचे कार्ड ज्येष्ठ नागरिकाला परत दिले. पैसे न मिळाल्याने ते घरी गेले.
काही वेळानंतर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या डेबिट कार्डाचा वापर करून त्यांच्या खात्यातून पैसे काढल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, एटीएम परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वळसंग करत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना मदतीच्या बहाण्याने हातचलाखी करून कार्ड बदलून फसवणूक करण्याच्या घटना यापूर्वी वारजे, रास्ता पेठ, खडकी भागातही घडल्या होत्या. विश्रामबाग पोलिसांनी अशा प्रकारात एका आरोपीला अटक केली होती. मात्र आता पुन्हा अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
