संजय गाढवेंनी दिली मीटरमुक्तीची ग्वाही
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या अमृत-२ पाणीपुरवठा योजनेच्या समर्थनार्थ गुरुवारी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या नेतृत्वाखाली शहरात मोर्चा काढण्यात आला. यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी गाढवे यांनी मीटरमुक्तीची आणि वाढीव नळपट्टी न आकारण्याची ग्वाही उपस्थितांना दिली.
योजनेची शहराला गरज असल्याने, पाणी कृती समिती आणि नागरिकांच्या वतीने शहरातील मेहंतीशावली दर्गाह येथून हा मोर्चा काढण्यात आला. वीर सावरकर चौक, महात्मा गांधी चौक, नागोबा चौक, ओंकार चौक मार्गे हा मोर्चा गोलाई चौकापर्यंत पोहोचला.
यावेळी माजी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे, कृती समितीचे अध्यक्ष दिलीप गाढवे, अॅड. पंडित ढगे, रोहन जाधव, नारायण वरवडे, भागवत शिंदे, रणजित साळुंके, डॉ. रामराव कोकाटे, अमोल भोसले, प्रभाकर हाके, पोपट जाधव, हभप योगेश आसलकर, तोफीक कुरेशी, संजय होळकर यांच्यासह माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चानंतर भूम नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शैला डाके यांना निवेदन सादर करण्यात आले.
मीटरच्या अंमलबजावणीचा निर्णय स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन घेईल, असे संजय गाढवे म्हणाले. भूम येथे काढण्यात आलेल्या मोर्चातील सहभागी नागरिकांसमोर बोलताना संजय गाढवे
दोन हजारांच्या पुढे नळपट्टी जाणार नाही.
जोपर्यंत मी आणि माझे सहकारी तुमच्या आशीर्वादाने नगरपालिकेत सत्तेत असू, तोपर्यंत मीटरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार नाही. शिवाय, ही योजना कार्यान्वित झाल्यावर शहरातील नळधारकांची नळपट्टी १,८०० ते दोन हजारांच्या पुढे जाणार नाही, अशी ग्वाही संजय गाढवे यांनी यावेळी दिली.
ही योजना संपूर्ण देशभरात राबविली जात असून, यात प्रत्येक नळाला मीटर बसवण्याची तरतूद आहे. मात्र, या मीटरच्या अंमलबजावणीचा निर्णय स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन घेईल, असेही गाढवे यांनी नमूद केले.
