दारुच्या नशेत ठेकेदाराशी हुज्जत घालणारा पीएसआयला केले निलंबित
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मद्यप्राशन करून गाडी चालवून अपघाताला कारणीभूत होऊ नये, यासाठी पोलीस दलाकडून नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली जाते. पण, एखादा श्रेणी पोलीस उपनिरीक्षकच दारूच्या नशेत ‘ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह’ची तपासणी करताना वाहनचालकाशी हुज्जत घालत असेल, तर? अशाच प्रकारामुळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी निलंबित केले आहे.
संजय सुधाकर माटेकर असे निलंबित करण्यात आलेल्या श्रेणी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक माटेकर हे लष्कर वाहतूक विभागात नेमणुकीस होते. त्यांना २९ जून रोजी पुलगेट पोलीस चौकीसमोर नाकाबंदीसाठी नेमण्यात आले होते.
त्यांच्याबरोबर पोलीस अंमलदार विजय सुताष आणि लष्कर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार मदतीला होते.यावेळी त्यांनी नवी मुंबईतील एका ठेकेदाराबरोबर वाद घातला. या ठेकेदाराने पिस्तूल काढण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी ठेकेदार अरुण निवृत्ती सूर्यवंशी आणि त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला.
त्याच वेळी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय माटेकर हे असंबंध बडबड करत होते. त्यांना वेळोवेळी शांत बसण्यास सांगितले असतानाही ते सतत बडबड करून गोंधळ घालत होते.
त्यामुळे पोलिसांनी ठेकेदाराबरोबर संजय माटेकर यांनाही ससून रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले.
ससूनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मद्याच्या अमलाखाली असल्याचा अहवाल दिल्यानंतर, त्यांच्या विरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.कर्तव्य बजावत असताना बेजबाबदारपणा आणि पोलीस खात्यास अशोभनीय असे गैरवर्तन केल्याने, तसेच पोलीस खात्याची प्रतिमा मलिन केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
