पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांचे नागरिकांना सलोख्याचे आवाहन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बार्शी शहरात येत्या ६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशी आणि मोहरम हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे होणार आहेत. आषाढी एकादशीनिमित्त भगवंत मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
हे मंदिर बार्शीतील वारकरी परंपरेचे महत्त्वाचे केंद्र असून, आषाढी एकादशीच्या दिवशी येथे श्री भगवंत रथोस्तव मिरवणूक काढली जाते, जी भक्ती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक मानली जाते.
याच दिवशी मुस्लिम समाजाचा मोहरम सण देखील साजरा होणार असल्याने, बार्शी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे, तसेच सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, “आषाढी वारी आणि मोहरम मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.
नागरिकांनी लहान मुलांचे आणि महिलांनी मौल्यवान दागिन्यांचे रक्षण करावे. कोणतीही अडचण आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.” स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने हे दोन्ही सण शांतता, मैत्रीपूर्ण आणि सामाजिक एकतेच्या वातावरणात पार पडावेत, असे आवाहनही पो. नि. बालाजी कुकडे यांनी केले आहे.
