दोन दिवसांत कोंढवा, बिबवेवाडी, आंबेगावात मोठ्या कारवाया : ४ जणांना अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ‘ड्रग्जमुक्त पुणे’ मोहिमेत पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी आणि रविवारी कोंढवा, बिबवेवाडी आणि आंबेगाव येथे केलेल्या तीन कारवायांमध्ये चौघांना अटक करून तब्बल ३० लाख ६७ हजार रुपयांचा गांजा, अफू आणि मेफेड्रॉन असा अंमली पदार्थ जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे व पोलीस अंमलदार हे ५ जुलै रोजी कोंढवा परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार सचिन माळवे यांना माहिती मिळाली की, भैरवनाथ मंदिरामागील संत कृपा बिल्डिंगसमोर एक व्यक्ती संशयास्पदरीत्या थांबलेला असून त्याच्याकडे अंमली पदार्थ असण्याची शक्यता आहे.
त्यानुसार पोलीस पथकाने तिथे जाऊन भागीरथराम रामलाल बिष्णोई (वय ४६, रा. टिळेकरनगर, कोंढवा) याला पकडले. त्याच्या ताब्यातून १४ लाख ९८ हजार रुपयांचा ७४९ ग्रॅम अफू, मोबाईल, हँड बॅग, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा एकूण १५ लाख ४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसरी कारवाई बिबवेवाडी भागात ५ जुलै रोजी करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक आणि पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार आझीम शेख यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी विठ्ठल ऊर्फ अण्णा रघुनाथ कराडे (वय ५७, रा. बिबवेवाडी) याला पकडले.
त्याच्या ताब्यातून ११ लाख २ हजार रुपयांचा ५५ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी), २ हजार रुपयांचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि मोबाईल असा एकूण ११ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तिसरी कारवाई आंबेगाव बुद्रुक येथे रविवारी करण्यात आली. आंबेगाव येथील शनिनगरकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर दोघेजण पोती घेऊन कोणाची तरी वाट पाहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी त्या दोघांना पकडले. त्यांच्याकडील पोत्यात ४ लाख ३९ हजार रुपयांचा २१ किलो ९७१ ग्रॅम गांजा, दोन मोबाईल आणि दुचाकी असा एकूण ४ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे व राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व प्रशांत अन्नछत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक आणि अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदीप शेळके, नितीन जगदाळे,
युवराज कांबळे, दिनेश बास्टेबाड, दयानंद तेलंगे, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, सर्जेराव सरगर, सचिन माळवे, संदीप शिर्के, विपुल गायकवाड, मारुती पारधी, विशाल दळवी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव व स्वप्नील मिसाळ यांनी केली आहे.


















