जेकेएसपी समर्पण फाउंडेशनच्या वतीने 343 विद्यार्थ्यांना 3100 वह्यांचे वाटप
नायगाव : माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा यांच्या प्रेरणेने व जेकेएसपी समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून नायगाव जिल्हा परिषद शाळा व मार्गवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. नायगाव जिल्हा परिषद शाळेतील 290 विद्यार्थ्यांना 2700 वह्या, तर मार्गवस्ती शाळेतील 53 विद्यार्थ्यांना 400 वह्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात शांताबाई ओमप्रकाश पोकर्णा, प्रकाश बोरा यांनी विशेष सहभाग घेतला. गतवर्षी पोकर्णा कुटुंबीयांच्या वतीने शालेय बॅग व छत्र्यांचेही वाटप करण्यात आले होते. चारित्र्य चूडामणी बा. ब्र. प. पू. श्री 1008 जीवराजजी म. सा. हे पोकर्णा कुटुंबीयांचे गुरूदेव असून, त्यांची जन्मभूमी ही नायगाव आहे.
या गुरूंच्या पुण्यस्मरणार्थ नायगाव गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प पोकर्णा कुटुंबीयांनी केला असून, शिक्षण क्षेत्रात सातत्याने उपयुक्त उपक्रम राबवले जात आहेत. पोकर्णा यांनी शासनाकडे पाठपुरावा करून गावासाठी ५० लाख रुपयांचा सार्वजनिक सभागृहासाठी निधी मंजूर करून घेतला असून, हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.
गावातील अन्य विकासकामांमध्येही त्यांचे सक्रिय योगदान लाभत आहे. कार्यक्रमास सरपंच कल्याणी हगवणे, माजी सरपंच अश्विनी चौधरी, राजेंद्र चौधरी, उत्तम शेलार, पोपट चौधरी, उत्तम घुले, मुख्याध्यापक संजय पवार, शिक्षक अमित लोणकर, शिक्षण समिती सदस्य, तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
