परराज्यातील मुलींकडून वेश्या व्यवसाय करवणारी महिला एजंट सपना कदम जेरबंद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मुंबई-बेंगळुरू महामार्गालगत सिंहगड रोड परिसरात परराज्यातील मुलींकडून देहविक्रीचा व्यवसाय करवणाऱ्या महिला एजंटला अटक करण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. १, गुन्हे शाखा पुणे शहरने यश मिळवले आहे. या कारवाईत एका महिलेची सुटका करण्यात आली असून आणखी तीन जणांवर कारवाई झाली आहे.
पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सपना राजाराम कदम (वय ३६, रा. खडकी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या महिला एजंटचे नाव आहे.
ती परराज्यातील मुलींचे फोटो ग्राहकांना पाठवून दर ठरवायची आणि नंतर त्या मुलींना ठराविक हॉटेलमध्ये पाठवून देहविक्री करायला लावत होती. पोलिसांनी सिंहगड रोड परिसरातील एका हॉटेलवर छापा टाकून एका परराज्यातील पीडित महिलेची सुटका केली.
सपना कदम ही तिच्या इतर तीन साथीदारांच्या मदतीने हा अवैध व्यवसाय चालवत होती. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) विवेक मासाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, सचिन माळवे, संदीप शिर्के, विपून गायकवाड, सुहास डोगरे, दयानंद तेलंगे, संदेश काकडे, दत्ताराम जाधव आणि स्वप्नील मिसाळ यांनी सहभाग घेतला.
