समर्थ पोलिसांची कामगिरी : चार तासांत गुन्हा उघड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : नाना पेठेतील दुकानाचे शटर वाकवून, दुकानातील टेबलच्या ड्रॉवरमधून पैसे चोरून नेणाऱ्या चोरट्यांना समर्थ पोलिसांनी अवघ्या चार तासांत जेरबंद केले.
सुजल राजन परदेशी (वय २०, रा. शिवाजी स्टेडियमसमोर, मंगळवार पेठ), सुभाष राजेश सरोज (वय २१), नितीन दिलीप सरोज (वय २२) आणि रोहित मुन्नालाल सरोज (वय २२, सर्व रा. मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अरीफ पठाण (वय ५५, रा. हडपसर) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पठाण यांचे नाना पेठेतील मॉर्डन हॉस्पिटलसमोर शार्प कलर हे दुकान आहे. ५ जुलै रोजी रात्री साडेअकरा ते ६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान, चोरट्यांनी दुकानाचे शटर कशाच्या तरी सहाय्याने वाकवून, शटरची कुलपे तोडून आत प्रवेश केला आणि टेबलच्या ड्रॉवरमधील १५,५०० रुपये चोरून नेले.
या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस अंमलदार अमोल गावडे आणि इम्रान शेख यांनी घटनास्थळी तसेच आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्याचबरोबर बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली. चौघांनी चोरीची कबुली दिली असून, मौजमजेसाठी चोरी केल्याचे सांगितले. गुन्ह्यातील चोरी केलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जांलिदर फडतरे, पोलीस अंमलदार पागार, रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, औचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश यादव यांनी केली आहे.
