खुनाचा प्रयत्न : मोकातील गुन्हेगारांना खडकी पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून केली अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या टोळक्यावर पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई करून ६ जणांना अटक केली होती. त्यांच्यातील दोघे सराईत गुन्हेगार फेब्रुवारीपासून पाच महिने फरार होते. पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी सापळा रचला असता, दोघांना पोलिसांचा सुगावा लागताच त्यांनी पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी दीड ते दोन किलोमीटर पाठलाग करून त्यांना जेरबंद केले.
राजेश ऊर्फ दाद्या नवनाथ घायाळ (वय १९, रा. दादा कॉम्प्लेक्स, डॉल्फिन चौक, अपर बिबवेवाडी) आणि करण ऊर्फ कर्या सुरेश जाधव (वय २५, रा. पड्याळ वस्ती, बोपोडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत जय शशिकांत गायकवाड (वय २०, रा. पड्याळ वस्ती, औंध रोड, खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना १४ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री सव्वा अकरा वाजता पड्याळ वस्तीतील कुणाल क्रिमसन सोसायटीसमोर घडली होती. फिर्यादी हे हॉटेलमध्ये काम करतात.
आरोपी तेजस गायकवाड, आदित्य शेंडगे, करण जाधव हे सर्वजण परिसरात दहशत माजवून दमदाटी करून हप्ता गोळा करत असतात. दोन वर्षांपासून या टोळक्यांबरोबर जय गायकवाड याचे भांडण सुरू होते.
१४ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा अकरा वाजता जय गायकवाड दुचाकीवरून घरी जात असताना या टोळक्याने त्याला पकडले. तेजस याने हातातील धारदार हत्याराने त्याच्या डोक्यावर दोनदा वार केला. इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
गंभीर जखमी झालेल्या जय गायकवाड याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खडकी पोलिसांनी या ८ जणांच्या टोळक्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी ६ जणांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. त्यानंतर या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. राजेश घायाळ व करण जाधव हे तेव्हापासून फरार होते.
या फरार आरोपींचा तपास करण्याचे आदेश सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांनी खडकी पोलिसांना दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्तात्रय बागवे यांनी तपास पथकाची बैठक घेऊन तपासाच्या दिशा आखल्या.
पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार अनिकेत भोसले यांनी अत्यंत मेहनत व तांत्रिक कौशल्य वापरून आरोपींचे सध्याचे मोबाईल क्रमांक मिळविले. त्यानंतर त्यांच्या दैनंदिन हालचालींचा सखोल अभ्यास करण्यात आला. आरोपींनी अनेकदा ठिकाणे बदलून पोलीस यंत्रणेला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला होता.
एका महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे पोलीस अंमलदार आबा केदारी, सुधाकर राठोड व ऋषिकेश दिघे यांच्या मदतीने सापळा रचण्यात आला. मात्र, आरोपींना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी तेथून पलायन केले. पोलिसांनी दीड ते दोन किलोमीटर पाठलाग करून शेवटी त्यांना पकडले.
खडकी पोलिसांनी दाखवलेली दक्षता, तांत्रिक कौशल्य आणि टीमवर्क यामुळे पाच महिने फरार असलेल्या या सराईत गुंडांना पकडण्यात यश आले आहे.
