मेव्हण्याचे कुटुंबीय घरी आले असताना त्यांच्या घरी जाऊन केली घरफोडी : कोंढव्यातील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मेव्हणा कामावर गेला असताना त्याचे कुटुंबीय अश्रफनगरमधील बहिणीच्या घरी गेले होते. त्याचदरम्यान चोरट्याने त्यांच्या घरात शिरून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, कोरे धनादेश असा २ लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. घराच्या सेफ्टी डोअरचे कुलूप व मेन डोअरचे कुलूप बनावट चावीने उघडून ही घरफोडी करण्यात आली होती. जुन्या पद्धतीचे जाडजूड कुलूप पाहून ही घरफोडी सराईत चोरट्याने नाही, तर घरातीलच कोणीतरी केल्याचे पोलिसांना जाणवले. त्या दृष्टीने तपास केल्यावर बहिणीच्या पतीनेच घरफोडी केल्याचे उघडकीस आले.
कोंढवा पोलिसांनी रोहेल अरशद शेख (वय ३६, रा. अश्रफनगर, अलिझा हाइट्स, कोंढवा बुद्रुक) याला अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरलेले २ लाख ४६ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
याबाबत शोएब इम्तियाज शेख (वय ३६, रा. टेनटेन्स बिल्डिंग, साईबाबानगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते मुस्लिम बँकेत कॅशियर म्हणून काम करतात. ते ७ जुलै रोजी सकाळी मुस्लिम बँकेत कामावर गेले.
त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता त्यांच्या कुटुंबातील सर्व जण घराचा दरवाजा बंद करून सेफ्टी डोअरला कुलूप लावून बहिणीच्या घरी, अश्रफनगर येथे गेले होते. सायंकाळी साडेसहा वाजता सर्व जण घरी परतले. तेव्हा त्यांच्या घराच्या सेफ्टी डोअरला लॉक नव्हते. मेन डोअरलाही लॉक नव्हते.
त्यांनी घरात जाऊन पाहिले असता, कपाटातील तिजोरीमधील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, तसेच वेगवेगळ्या रकमेचे ७ कोरे धनादेश असा २ लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता.
कोंढवा पोलिसांनी घरातील एकूण परिस्थिती पाहिली असता, ती घराची माहिती असलेल्या कोणीतरी केल्याचे लक्षात आले. आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अनिल बनकर आणि केशव हिरवे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, ही चोरी रोहेल शेख याने केली असून तो अश्रफनगर येथील अलिझा हाइट्स येथे थांबलेला आहे.
या माहितीनुसार पोलिसांनी परिसरात शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. तेव्हा रोहेल शेख हा फिर्यादी यांच्या बहिणीचा पती असल्याचे उघड झाले. त्याला घराची संपूर्ण माहिती होती. त्यांच्या घरी येत-जात असताना त्याने घराच्या कुलूपांच्या चाव्या घेतल्या होत्या. फिर्यादीचे कुटुंबीय त्यांच्या घरी गेले असताना त्याने त्यांच्या घरी जाऊन चोरी केली होती. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेले २ लाख ४६ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम पोलिसांच्या ताब्यात दिली.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप आणि वर्षा देशमुख यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, संतोष बनसुडे, अभिजित जाधव, अभिजित रत्नपारखी, सुरज शुक्ला, विजय खेगरे, राहुल थोरात, अनिल बनकर, सुजित मदन, विकास मरगळे आणि केशव हिरवे यांनी केली आहे.
