हॉटेल मालक, व्यवस्थापकावर कारवाई : एफडीएच्या अहवालानंतर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : हॉटेलमध्ये सहकुटुंब जेवणासाठी गेलेल्या एका महिलेला दिलेल्या सूपमध्ये झुरळ आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या सूपची तपासणी केल्यावर ते सूप आरोग्यास अपायकारक असल्याचा अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल आल्यावर एम. जी. रोडवरील भिवंडी दरबार या हॉटेलचे मालक व व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अश्विनी रवी शिरसाट (वय ३१, रा. दापोडी) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी भिवंडी दरबार हॉटेलचे व्यवस्थापक अमन हुसेन शेख (वय २४, रा. आझादनगर, वानवडी) व हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना महात्मा गांधी रोडवरील भिवंडी दरबार हॉटेलमध्ये १६ जून रोजी रात्री सव्वा नऊ वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अश्विनी शिरसाट या कुटुंबासह जेवणासाठी भिवंडी दरबार हॉटेलमध्ये गेल्या होत्या.
जेवणापूर्वी त्यांना सूप देण्यात आले. त्या सूपमध्ये त्यांना झुरळ आढळून आले. त्यांनी हॉटेल व्यवस्थापनाकडे याबाबत तक्रार केली, मात्र त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
पोलिसांनी ते सूप जप्त केले व परीक्षेसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे पाठविले. तपासणीअंती प्रशासनाने दिलेल्या अहवालात ते सूप आरोग्यास अपायकारक असल्याचे स्पष्ट झाले.
हॉटेल व्यवस्थापनाकडून कोणत्याही प्रकारची स्वच्छतेची दक्षता न घेता ग्राहकांच्या जिवीतास अपायकारक खाद्यपदार्थ दिले गेले व त्यामुळे ग्राहकांच्या जिवितास धोका निर्माण झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. लष्कर पोलीस अधिक तपास करत आहेत.
